Home Cities जळगाव आषाढी एकादशीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय परिसरात चिमुकल्यांची भक्तिमय दिंडी

आषाढी एकादशीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय परिसरात चिमुकल्यांची भक्तिमय दिंडी

0
1

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जळगाव खुर्द येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात निघालेल्या या दिंडीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. विशेष म्हणजे परिसरातील चिमुकल्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वारकरी परंपरेचा आनंद लुटला.

दिंडी सोहळ्याला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या बालकांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या भक्तीचा सुंदर आविष्कार सादर केला. टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरली इशान्वी आशिष भिरूड, जिने रुक्मिणीची आकर्षक वेशभूषा परिधान केली होती. तिच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांनी चिमुकल्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करणाऱ्या या उपक्रमाचे स्वागत केले.
दिंडीत परिसरातील महिला, युवक आणि नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विठ्ठल भक्तीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडले. शेवटी विठ्ठलाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Protected Content

Play sound