जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आषाढी एकादशीचे औचित्य साधत जळगाव येथील गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये भक्तिमय वातावरणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत साकारलेल्या पालखी सोहळा, रिंगण आणि विठ्ठलनामाच्या जयघोषामुळे संपूर्ण शाळा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेची ओळख करून देत भारतीय संस्कृतीचे संस्कार जोपासण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्या नीलिमा चौधरी यांच्या हस्ते पालखीचे विधिवत पूजन करून झाली. त्यानंतर टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि “ज्ञानोबा-तुकाराम”, “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” या जयघोषात पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले.
इयत्ता सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा प्रभावीपणे साकारली. पारंपरिक पोशाख, भगवे पताके, तुळशी वृंदावन तसेच विठ्ठल-रुक्मिणी यांच्या आकर्षक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी पंढरपूरच्या वारीचे जिवंत चित्र उभे केले. विशेषतः रिंगण सोहळ्याच्या सादरीकरणाने उपस्थित पालक, शिक्षक आणि मान्यवरांची मने जिंकली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या विचारांची ओळख करून देत भक्ती, समता, सेवा आणि एकात्मतेचे मूल्य रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आधुनिक शिक्षणासोबत भारतीय संस्कृती व परंपरांप्रती आदरभाव निर्माण करण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्या नीलिमा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.




