नवी दिल्ली प्रतिनिधी । आरेमधील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात किती झाडे लावण्यात आली. त्यातील किती झाडे जगली याचा तपशीलवार माहिती, फोटोसहीत सादर करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने एमएमआरसीएलला दिले आहेत. आरेतील वृक्षतोडीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.
यावेळी सुप्रीम कोर्टाने वृक्षतोडीवरील मनाई आदेश कायम ठेवताना ‘जैसे थे’ स्थिती १५ नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवली आहे. आरे कॉलनीत कुठेही सध्या वृक्षतोड किंवा छाटणी होत नसल्याचे निवेदन सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आजच्या सुनावणीत केले. त्यानंतर न्यायमूर्ती अरुण मिश्रा व न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने सर्व याचिकांवरील पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला ठेवून तोपर्यंत आधीचा आदेश कायम ठेवला आहे. त्यामुळे मेट्रो प्रशासनाला आणखी वृक्षतोड करता येणार नाही. आरेतील झाडे तोडण्यात येणार असल्यामुळे पर्यायी झाडे लावण्यात आली असल्याची माहिती एमएमआरसीएलने दिली. त्यावर कोर्टाने झाडांबाबतची माहिती मागितली आहे. त्याशिवाय आम्हाला संपूर्ण परिसर पाहायचा असल्याचे सुप्रीम कोर्टाने प्रशासनाला सांगितले. दरम्यान, आरेमध्ये मेट्रो कारशेडशिवाय इतरही कोणते प्रकल्प येणार आहेत ,का अशी विचारणादेखील कोर्टाने केली आहे. पुढील सुनावणी आता १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी एमएमआरसीएलची बाजू मांडली.