नायगाव कोळीवाड्यात आजपासून १४ दिवसांचा कडकडीत बंद; महापालिकेचे आदेश

पालघर वृत्तसंस्था । कोरोना विषाणूच्या संसर्गाने मुंबईसह आजूबाजूच्या जिल्ह्यांनाही वेढा घातला आहे. वसईच्या नायगाव कोळीवाड्यात देखील अशीच स्थिती तयार झाली. अखेर वसई-विरार महापालिकेने या ठिकाणी आजपासून १४ दिवसांचा कडकडीत बंद लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितलं आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत.

एकट्या नायगाव कोळीवाड्यात मागील 8 ते 10 दिवसात 22 हून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर सोमवारी (22 जून) एका कोरोना रुग्णाचा दुर्दैवी मृत्यूही झाला. या परिसरात दाटीवाटीची लोकवस्ती आहे. सुखदुःखात एकत्र येणे, ओटीवर बसणे, समुहाने फिरणे असे सर्व प्रकार या परिसरात सुरुच असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळेच नायगाव कोळीवाडा परिसरातील बेसिन कॅथलिक बँक ते नायगाव स्टेशन परिसराकडील कोळीवाड्याची हद्द पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यानिमित्ताने स्थानिक नागरिकांनी कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रभाग समिती (आय)चे सहाय्यक आयुक्त सुभाष जाधव यांनी केलं आहे.

Protected Content