पारोळ्यात आरोग्य दूताला मदत : वडिलांच्या स्मरणार्थ व्हीलचेअर भेट !


पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील बी.टी.व्ही. मराठीचे संचालक दीपक भावसार यांनी आपले वडील, स्वर्गीय जी.जे. भावसार सर यांच्या स्मरणार्थ एक महत्त्वपूर्ण सामाजिक कार्य केले आहे. आपल्या मातोश्रींच्या हस्ते त्यांनी पी.जी. पाटील जनसेवक यांच्याकडे एक व्हीलचेअर सुपूर्द केली.

दीपक भावसार यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, पी.जी. पाटील जनसेवक हे खऱ्या अर्थाने ‘आरोग्य दूत’ म्हणून समाजात उत्तम काम करत आहेत. त्यांनी कोरोना महामारीच्या काळापासून कोणतीही प्रसिद्धी न मिळवता पारोळा शहरातील गरजूंना अविरत मदत केली आहे. यात १०० खुर्च्या, १०० वॉकर यांसारख्या साहित्याचा समावेश असून, अपंग व्यक्ती, फ्रॅक्चर झालेले रुग्ण किंवा वृद्ध व्यक्ती असोत, त्यांना कायम मदत करण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. शहरात गोरगरीब रुग्णांना ते बरे होईपर्यंत मोफत सेवा देतात. म्हणूनच, त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून दीपक भावसार यांनी पी.जी. पाटील यांना घरी बोलावून आपल्या आईच्या हस्ते ही व्हीलचेअर भेट दिली.

“समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, याच भावनेतून मी ही छोटी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि भविष्यातही कोणतीही मदत लागल्यास ती देण्याचे आश्वासन मी देतो,” असे भावसार म्हणाले.

यावेळी पी.जी. पाटील जनसेवक यांनी दीपक भावसार यांचे आभार मानले. ते म्हणाले की, कोरोना काळापासून अनेक मित्रपरिवाराने चांगल्या कामासाठी वेळोवेळी मदत केली आहे आणि दीपक भावसार हे नेहमीच चांगल्या कामांसाठी तत्पर असतात. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशा व्यक्तींची समाजाला खूप गरज आहे, असे मत पी.जी. पाटील यांनी व्यक्त केले.