Home क्राईम टँकरची ट्रक आणि जेसीबीला भीषण धडक; वृद्ध गंभीर जखमी !

टँकरची ट्रक आणि जेसीबीला भीषण धडक; वृद्ध गंभीर जखमी !


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहराच्या अलीकडे असलेल्या धुळे बायपासवरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर एक भीषण आणि विचित्र अपघाताची घटना घडली आहे. एक भरधाव टँकर चालकाने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला आणि वळण घेत असलेल्या जेसीबी मशीनला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रकमध्ये असलेले निंभा हरचंद पाटील हे वृद्ध गंभीर जखमी झाले असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निंभा पाटील हे १९ मे रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास ट्रक (एमएच १८ बीझेड ३९२०) घेऊन जात होते. दरम्यान त्यांनी ट्रक पारोळा बायपासवरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या खाली सुरक्षित जागी उभा केला होता. याच दरम्यान तेथे एक जेसीबी मशीन (एमएच १७ सीएम ५७१०) वळण घेत असताना, धुळ्याकडून येणाऱ्या एका अनियंत्रित टँकरच्या (जीजे ०६ व्हीटी ५७४०) चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून जेसीबीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, जेसीबी मशीन पुढे जाऊन उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडकली. या दुहेरी धडकेमुळे निंभा हरचंद पाटील यांच्या डोक्याला आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. तसेच या अपघातात टँकर, ट्रक आणि जेसीबी या तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ चंद्रशेखर सोनवणे हे करीत आहे.


Protected Content

Play sound