फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर येथील श्रीकृष्ण महानुभाव मंदिर यांच्या वतीने आयोजित धर्म संस्कार शिबिरात बालकांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला असून शास्त्र आणि शस्त्र या दोन्ही क्षेत्रांतील ज्ञान, स्वसंरक्षण, योग, प्राणायाम, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी यांचा समन्वय साधणारे हे शिबिर व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम ठरत असल्याचे प्रतिपादन कृष्णराज बाबा पाचराऊत यांनी केले. सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या धर्म संस्कार शिबिराच्या समारोप व बक्षीस वितरण समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या कार्यक्रमाला पूज्य हरिराज बाबा पुजदेकर, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष एस. व्ही. चौधरी, डॉ. भरत महाजन, अनंता नेहते, नितीन महाजन यांच्यासह सहभागी विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक, सामाजिक आणि नैतिक मूल्यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

श्रीकृष्ण महानुभाव मंदिरचे गादीपती पूज्य राजधर बाबा पुजदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली १५ मेपासून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आधुनिक काळात वाढत चाललेला मोबाईलचा अतिरेक, नैतिक मूल्यांची घसरण, पालकांप्रती कमी होत चाललेला आदर आणि पर्यावरणाबद्दलची अनास्था लक्षात घेऊन मुलांमध्ये चांगले संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबिरात सहभागी बालकांना गीतापठण, मंत्र, श्लोक पाठांतर, संत-महात्म्यांचे मार्गदर्शन, योगासने, ध्यान, प्राणायाम, स्वसंरक्षण प्रशिक्षण, विविध खेळ आणि स्पर्धांच्या माध्यमातून संस्कारक्षम शिक्षण देण्यात आले. तसेच वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबवून सामाजिक जबाबदारीची जाणीवही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यात आली. प्रत्येक मुलाने किमान एक वृक्ष लावण्याचा संकल्प केल्याने शिबिराला पर्यावरणपूरक संदेशही लाभला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी केले. त्यांनी शिबिरातील विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करत शिबिराचा उद्देश यशस्वी झाल्याचे सांगितले. ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष एस. व्ही. चौधरी यांनी अशा प्रकारची संस्कारक्षम शिबिरे सातत्याने आयोजित होणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले आणि भविष्यातही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी पूज्य राजधर बाबा पुजदेकर यांनी शिबिरातील विद्यार्थ्यांच्या अनुभवांचे आणि मजेदार प्रसंगांचे वर्णन करताना सहभागी मुलांनी शिबिर संपुष्टात येऊ नये अशी भावना व्यक्त केल्याचे सांगितले. मुलांच्या उत्साहामुळे आणि पालकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आयोजकांना समाधान वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले.
समारोप प्रसंगी सहभागी सर्व मुलांना प्रमाणपत्र आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. चित्रकला, निबंध, वक्तृत्व, लिंबू-चमचा, बेडूक उड्या यांसारख्या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
सहभागी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना शिबिरातील प्रत्येक सत्राने जीवनात सकारात्मक बदल घडविल्याचे सांगितले. धर्म, संस्कार, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचे धडे आयुष्यभर पाळणार असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन पूज्य राजधर बाबा पुजदेकर यांनी मानले.



