मॉक पार्लमेंटमध्ये केसीईचे विद्यार्थी चमकले; हर्षा ओच्छानी ठरली ‘उत्कृष्ट स्पीकर’ !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र यांच्या वतीने आणीबाणीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त २३ जून २०२५ रोजी दापोरीकर हॉल, जळगाव येथे आयोजित केलेल्या “मॉक पार्लमेंट” (नमुना संसद) वादविवाद स्पर्धेत केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे.

या स्पर्धेत केसीई महाविद्यालयातर्फे आयुषी ओच्छानी, हर्षा ओच्छानी, मृणाल पाटील, अजय पाटील आणि दिवेश सोनवणे या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. एकूण ६० सहभागींमधून, केसीई महाविद्यालयाची विद्यार्थिनी हर्षा ओच्छानी हिने उत्तेजनार्थ पुरस्कारासह ‘उत्कृष्ट स्पीकर’ म्हणून स्थान पटकावले. तिने या मॉक पार्लमेंटमध्ये भाजप पक्षाचे प्रतिनिधित्व केले. तसेच, मृणाल पाटील हिने अर्थमंत्री आणि दिवेश सोनवणे याने शिक्षणमंत्री ही पदे भूषवली.

या सत्रामध्ये १९७५ ते १९७७ या आणीबाणीच्या कालखंडाचे पुनरुत्थान करण्यात आले होते, जिथे भाजप सत्ताधारी पक्ष आणि काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून कार्यरत होते. हा कार्यक्रम भारतीय संविधानावर आधारित संसद सत्राच्या स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. प्रत्येक सहभागीला ९० सेकंदांचा वेळ आपले विचार मांडण्यासाठी दिला होता. इतर स्पर्धकांच्या मतांवर शंका उपस्थित करण्यासाठी सहभागींना आपला क्रमांक असलेली बॅच उचलून प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. ही संपूर्ण प्रक्रिया दोन सत्रांमध्ये पार पडली.

कार्यक्रमाचे उद्घाटन आ. राजूमामा भोळे, यांच्या हस्ते झाले. विशेष अतिथी म्हणून विश्वास कुलकर्णी उपस्थित होते, ज्यांनी आणीबाणीच्या काळात कारावास भोगला होता. त्यांनी आपले अनुभव विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणे संवाद साधून शेअर केले. प्रा. विजय एन. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना समन्वयक म्हणून मार्गदर्शन केले. प्रथम वर्ष अभियांत्रिकी संगणक विभागातील विद्यार्थिनी मृणाल पाटील हिने कार्यक्रमाच्या शेवटी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन, अकॅडमिक डीन, सर्व विभागप्रमुख आणि प्राध्यापक वृंद यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.