धानोरा (ता. चोपडा)-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।श्री क्षेत्र धानोरा येथे ९ ते १४ एप्रिल दरम्यान आयोजित ‘चतुर्विध महोत्सवा’ने संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्साही वातावरणात न्हाऊन निघाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. १४) त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून ‘समरसता संत संमेलनाची’ मंगलमय सुरुवात करण्यात आली. या सोहळ्यात विविध संतांच्या उपस्थितीत समाजात एकात्मता, समता आणि शांततेचा संदेश देण्यात आला.
महोत्सवाच्या निमित्ताने गावातून काढण्यात आलेल्या अखंड तुपाच्या धारेमुळे परिसरात सुख-समृद्धी नांदेल आणि या यज्ञाचा लाभ पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना होईल, असा विश्वास उपस्थित संतांनी व्यक्त केला. सतपंथ मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे धानोरा गाव पूर्णपणे भक्तिरसात रंगून गेले होते.

कार्यक्रमात प्रतिपादन करताना महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनी ‘चतुर्विध महोत्सव’ हा कुंभमेळ्याचा जनक असल्याचे सांगितले. धानोरा गावाचा गौरव करताना त्यांनी मुक्ताई रत्न पुरस्कार हा वैयक्तिक नसून संपूर्ण सतपंथ संप्रदायाचा सन्मान असल्याचे नमूद केले. तसेच, या मंदिराला आता ‘श्री क्षेत्र’ म्हणून ओळख मिळाल्याने पुढे ‘श्री क्षेत्र धानोरा’ असा उल्लेख करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
जगद्गुरु रामराजेश्वराचार्यजी महाराज यांनी आपल्या भाषणातून आध्यात्मिक समरसतेचे महत्त्व अधोरेखित केले. ज्या गावात समरसता असते तेच गाव खऱ्या अर्थाने समृद्ध होते, असे सांगत त्यांनी मराठीतून सुंदर काव्य सादर केले. “समरसतेची सुरुवात आपल्या घरापासूनच करा,” असा प्रभावी संदेश त्यांनी दिला.
जगद्गुरु शंकराचार्य रामराजेश्वर रामादाचार्यजी महाराज यांनी सतपंथ संप्रदायाची ओळख ‘वैदिक धर्माचा आत्मा’ अशी करून दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षणाचे दीपस्तंभ असल्याचे सांगत त्यांनी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित राहण्याचे आवाहन केले. जगद्गुरु सतपंथाचार्य ज्ञानेश्वर देवाचार्यजी महाराज यांनीही मार्गदर्शन करत सर्व हिंदूंनी एकजुटीने देश व धर्माची सेवा करावी, तसेच शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळावे अशी प्रार्थना व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनी स्थानिक आमदारांच्या अनुपस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. एवढ्या भव्य आणि दिव्य महोत्सवाला आमदार उपस्थित राहिले नाहीत, ही खेदाची बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. स्वतः येणे शक्य नसल्यास किमान प्रतिनिधी किंवा शुभेच्छापत्र पाठवण्याची अपेक्षा होती, असेही त्यांनी नमूद केले.
सतपंथ ज्योत मंदिराच्या जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठेनंतर सर्व संतांचे आशीर्वचन घेण्यात आले. महाप्रसादाने या भव्य ‘चतुर्विध महोत्सवा’ची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनी केले, तर आभार प्रदर्शन संत विजय प्रकाशजी महाराज यांनी मानले. या सोहळ्यासाठी धानोरा आणि परिसरातील सुमारे २५ ते ३० हजार भाविकांनी उपस्थिती लावली होती.



