यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त यावल नगरपालिकेच्या वतीने अत्यंत आदरपूर्वक अभिवादन करून कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यात आली. या निमित्ताने नगरपालिकेत आयोजित कार्यक्रमात शहरातील मान्यवर, पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावल नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष सौ. छायाताई पाटील आणि माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल वसंत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी उपस्थित सर्वांनी संविधान निर्माता म्हणून त्यांच्या योगदानाची आठवण करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमात नगरपालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पाणीपुरवठा विभागाचे डी.एच. धोत्रे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनीही यावेळी डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. तसेच यावल नगरपालिकेतील शिवसेना (उबाठा) गटनेते सागर चौधरी, शिक्षण, सांस्कृतिक व क्रीडा समिती सभापती पराग विजय सराफ, नगरसेवक उमर कच्छी, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष हकीम शेख मोहम्मद याकूब, माजी नगरसेवक करीम मनियार यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला.
याशिवाय सामाजिक कार्यकर्ते निलेश बारी, किशोर उर्फ गोलू माळी, स्वामी पाटील, राहुल कचरे, विजय मराठे, विजय नन्नवरे, पल्लवी महाजन, संतोष नन्नवरे, मुकेश गजरे, तसेच नगरपालिका कर्मचारी मोबीन शेख आदी उपस्थित राहून महामानवाला आदरांजली वाहिली. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे अनुसरण करून समाजात समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्याचा संकल्प व्यक्त केला.



