Home Cities जळगाव शिवाजीनगर भागात महापालिकेच्या वीज विभागाचा भोंगळ कारभार; दिवसा दिवे सुरू तर रात्री...

शिवाजीनगर भागात महापालिकेच्या वीज विभागाचा भोंगळ कारभार; दिवसा दिवे सुरू तर रात्री अंधार


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिवाजीनगर परिसरात विजेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्याचे समोर आले आहे. शिवाजीनगरमधील दत्त कॉलनी, उमर कॉलनी, टीचर कॉलनी, रेल्वे पूल आणि चिसतीया कॉलनी या भागात पथदिवे चक्क २४ तास सुरू राहत असून, याउलट काही भागात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. या गंभीर प्रकारामुळे एकीकडे विजेची उधळपट्टी होत आहे, तर दुसरीकडे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

याप्रकरणी अल्पसंख्यांक सेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जहांगीर अहमद खान यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांनी थेट महापौर दीपमाळा ताई काळे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे, ही तक्रार देताना नगरसेवक  विजय बांदल हे स्वतः उपस्थित होते.

खान यांनी आरोप केला आहे की, या संदर्भात गेल्या दहा दिवसांपूर्वी महापालिकेचे मुख्य विद्युत अधिकारी श्री. मोरे यांच्याकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

शिवाजीनगर विद्युत विभागाचे अधिकारी मेढे यांच्या कार्यपद्धतीवरही यावेळी ताशेरे ओढण्यात आले. मेढे हे गेल्या दहा दिवसांपासून नागरिकांचे फोन उचलत नसल्याचा आणि आपल्या कामात कसूर करत असल्याचा आरोप जहांगीर अहमद खान यांनी केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही कर्मचारी आणि संबंधित अधिकारी कामचुकारपणा करत असल्याने प्रशासकीय शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ही वीज गळती तातडीने थांबवून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound