चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यात गोवंश संरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते रोहित निकम यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी आणि चोपडा शहर पोलिस ठाण्याला निवेदन सादर करत विविध गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधले. गोरक्षकांवरील कथित अन्याय, गोवंश पळविण्याच्या घटना आणि कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी यावर त्यांनी प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी केली आहे.
१३ एप्रिल २०२६ रोजी रोहित निकम यांनी प्रत्यक्ष पोलिस प्रशासनाची भेट घेत निवेदन दिले. यावेळी भाजप गटनेते गजेंद्र जैस्वाल, शरद पाटील, अनिल वानखेडे, सागर नेवे, जिग्नेश कंखरे, संग्राम परदेशी, श्याम सोनार, मनीष गुजराथी, हरीश माळी, प्रेम घोगरे, विशाल भावसार, मनोहर बडगुजर, अशोक शिंपी, कमलेश सोनवणे, विशाल भोई यांसह अनेक पदाधिकारी आणि गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदनात नमूद केल्यानुसार, चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागात गोरक्षकांनी वाचवलेल्या गावठी गायींचे पोलिस प्रशासनाच्या सूचनेनुसार बळजबरीने उद्ध्वस्तीकरण केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच गोरक्षकांना धमक्या देणे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे आणि त्यांना दबावाखाली आणण्याचे प्रकार सुरू असल्याचेही नमूद करण्यात आले. क. जि. एन. कॉलनी परिसरात कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या सुमारे ७० गोवंशीयांना काही संशयितांनी पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला असून, यावेळी गोरक्षक आणि पोलिसांवर प्राणघातक हल्ला झाल्याचेही सांगण्यात आले आहे. या घटनेचे व्हिडिओ, फोटो आणि जीपीएस पुरावे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला.
पूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडूनही तक्रारींवर अपेक्षित कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. काही पोलिस कर्मचारी संशयितांना पाठिंबा देत असल्याचा गंभीर आरोपही या निवेदनातून करण्यात आला आहे. तसेच गौहत्या प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे नमूद करून शासनाने देशी गायींना दिलेल्या “राज्यमाता-गौमाता” दर्ज्याचा उल्लेख करण्यात आला.
रोहित निकम यांनी प्रशासनाकडे केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये गावठी गायींचे बळजबरीने उद्ध्वस्तीकरण तात्काळ थांबवणे, गोरक्षकांवरील गुन्हे रद्द करणे, गौहत्या प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे, गोरक्षकांना धमकावणाऱ्यांवर कारवाई करणे, स्थानिक गोशाळांना पोलिस संरक्षण व शासकीय मदत देणे आणि पळवून नेलेला गोवंश तात्काळ परत मिळवून संबंधितांवर कठोर कारवाई करणे यांचा समावेश आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना रोहित निकम यांनी स्पष्ट इशारा दिला की, “राज्यमाता गोमातेचे रक्षण करणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. गोरक्षक हे गुन्हेगार नसून रक्षक आहेत.” मागण्या मान्य न झाल्यास चोपडा येथे शांततापूर्ण आंदोलन छेडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. गोरक्षक संघटनांनी या भूमिकेला पाठिंबा दर्शवला असून सकल हिंदू समाजाकडून प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.



