Home Cities जळगाव जळगावातील बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याची SIT चौकशी करा ; दोषींवर कठोर कारवाईची...

जळगावातील बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याची SIT चौकशी करा ; दोषींवर कठोर कारवाईची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
3

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील कथित बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याची राज्यस्तरीय विशेष तपास पथक (SIT) मार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्याची विनंती करण्यात आली असून, या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

प्रा. भाऊसाहेब सुकदेव सोनवणे यांनी दिलेल्या निवेदनात राज्यातील खासगी अनुदानित शाळांमध्ये कथितपणे बनावट वैयक्तिक मान्यता आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी तयार करून शासनाच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपयांचे वेतन काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पात्र व गुणवंत उमेदवारांवर अन्याय झाला असून शासनाच्या निधीचाही मोठा अपव्यय झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनात या प्रकरणाची व्याप्ती केवळ एका जिल्ह्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण राज्यभर असल्याचा आरोप करत, राज्यस्तरीय विशेष तपास पथक (SIT) ने निष्पक्ष चौकशी करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात सहभागी असलेल्या संबंधित शिक्षण अधिकारी, कर्मचारी, संस्थाचालक आणि कथित बोगस शिक्षकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

याशिवाय, बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून काढण्यात आलेले वेतन संबंधित दोषी अधिकारी व संस्थाचालकांकडून व्याजासह वसूल करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सन २०१२ नंतर मंजूर झालेल्या सर्व शालार्थ आयडी आणि वैयक्तिक मान्यतांचे विशेष लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात यावे, जेणेकरून अशा प्रकारच्या कथित गैरव्यवहारांचा संपूर्ण तपशील समोर येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन ते मुख्यमंत्री कार्यालयाकडे आवश्यक पुढील कार्यवाहीसाठी तातडीने पाठवावे, अशी विनंती करण्यात आली आहे. या वेळी निवेदन देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, तालुका प्रमुख प्रमोदभाऊ घुगे, राजेंद्र पाटील, मनसेचे प्रदीप पाटील, प्रेमराज राठोड, किरण ठाकूर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound