जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात भारतरत्न आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक आणि व्याख्याते श्री. सुरेश कुलकर्णी उपस्थित होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे आणि पर्यवेक्षिका रमा तारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात रेवती किन्हीकर यांच्या प्रास्ताविकाने झाली, त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यावर मराठी आणि इंग्रजी भाषेतून प्रभावी भाषणे सादर केली. यामध्ये प्रसाद जैन, हर्षदा चौधरी, तृषा पाटील, प्रज्वल साळुंखे, खुशाल पाटील, गौरव साबळे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सांस्कृतिक कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षिका पद्मजा जोशी यांनी सुरेल गीत सादर केले, तर संपदा तुंबडे यांनी स्वतः रचलेली कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच मनिषा वानखेडे व श्रीकांत घुगे यांनी डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. प्रमुख वक्ते सुरेश कुलकर्णी यांनी बाबासाहेबांनी शोषित, वंचित, कामगार आणि महिलांच्या उद्धारासाठी केलेल्या संघर्षाची माहिती देत त्यांच्या धम्मदीक्षेमागील भूमिका सविस्तरपणे मांडली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा मिळावी या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तके शालेय ग्रंथालयास भेट दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात शील, प्रज्ञा आणि करुणा या गुणांची जोपासना करून ज्ञानवंत व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सूत्रसंचालन सुनीता रोटे यांनी केले, तर संगीता कुलकर्णी यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमनाथ महाजन, कविता कुऱ्हाडे, राकेश चौधरी, दीपक पाटील यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



