Home Cities जळगाव गुरुपौर्णिमेनिमित्त जळगावात ‘भक्तीनाद’ भजन संध्येचे आयोजन 

गुरुपौर्णिमेनिमित्त जळगावात ‘भक्तीनाद’ भजन संध्येचे आयोजन 

0
13

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत जळगावातील स्थानिक ‘भक्तीनाद’ भजन संध्या ग्रुप आणि संतश्रेष्ठ गजानन महाराज बहुउद्देशीय ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भक्तिमय वातावरणात ‘भजन संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. २९ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता मोहाडी रोडवरील श्री गजानन महाराज मंदिर प्रांगणात हा भक्तिरसाचा सुरेल सोहळा रंगणार असून भाविकांना भक्ती, संगीत आणि अध्यात्माचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे.

या कार्यक्रमात गायक गुलाब कापडणे, विनायक रडे, सुभाष मिस्त्री, तसेच गायिका वृंदा पालखे आणि प्रवीण पाटील हे विविध भक्तिगीते सादर करून उपस्थितांना भक्तीरसात तल्लीन करणार आहेत. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण आणि प्रभावी निवेदन कलावंत तसेच ‘भक्तीनाद’ ग्रुपचे संचालक तुषार वाघुळदे करणार असून, त्यांच्या निवेदनामुळे कार्यक्रमाची रंगत अधिक खुलणार आहे. भजन संध्येपूर्वी सामूहिक गुरुपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंदिर परिसरात “गण गण गणात बोते” च्या जयघोषात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

या भक्तिमय कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, महिला, युवक तसेच सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘भक्तीनाद’ ग्रुपचे संचालक तुषार वाघुळदे तसेच संतश्रेष्ठ गजानन महाराज बहुउद्देशीय ट्रस्टचे अध्यक्ष अरुण सोनवणे, उपाध्यक्ष ॲड. प्रकाश दप्तरी, सचिव संजय येवले, विश्वस्त प्रकाशचंद्र वडनेरे, मधुकर पाटील, हेमंत विसपुते, अतुल मुळे, सुधीर सोनवणे आणि रवींद्र पाटील यांनी केले आहे. गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त आयोजित हा भक्तिमय स्वरसोहळा जळगावकरांसाठी आध्यात्मिक ऊर्जा, सांस्कृतिक परंपरा आणि भक्तिसंगीताचा अनोखा अनुभव ठरणार असून, मोठ्या संख्येने भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound