Home धर्म-समाज गुरुपौर्णिमेला शासकीय सुट्टी द्या – संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज

गुरुपौर्णिमेला शासकीय सुट्टी द्या – संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज

0
11

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गुरुपौर्णिमा हा गुरु-शिष्य परंपरेतील अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महत्त्वाचा दिवस असून, या दिवशी राज्य व केंद्र सरकारने शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी अखिल भारतीय संत समाज समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पाल येथील श्री वृंदावन धाम आश्रमाचे प्रमुख संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांनी केली. गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त पाल येथील आश्रमात आयोजित सत्संग कार्यक्रमात त्यांनी ही भूमिका मांडत गुरु-शिष्य नात्याचे महत्त्व अधोरेखित केले.

रावेर तालुक्यातील पाल येथील परमपूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम, श्री वृंदावन धाम येथे गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातून अंदाजे एक लाखांहून अधिक चैतन्य साधक, भक्त आणि भाविकांनी आश्रमात उपस्थित राहून सद्गुरूंच्या समाधीचे दर्शन, सत्संग आणि विविध धार्मिक विधींचा लाभ घेतला. संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज म्हणाले की, शासकीय कर्मचारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक वर्षभर विविध जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांना आपल्या गुरूंसोबत वेळ घालवून आत्मिक शांती, ज्ञान आणि संस्कारांचा अनुभव घेण्याची संधी मिळावी, यासाठी या दिवशी शासकीय सुट्टी घोषित करणे आवश्यक आहे. राज्य व केंद्र सरकारमधील लोकप्रतिनिधी, मंत्री, तसेच देशभरातील संत, महंत आणि पीठाधिपती यांनीही ही मागणी शासनापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.

सत्संगादरम्यान संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांनी गुरु-शिष्य परंपरेचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करत दोन प्रकारच्या मानवी जन्मांची संकल्पना मांडली. त्यांनी सांगितले की, पहिला जन्म हा ‘बिंदूज जन्म’, तर गुरूकडून दीक्षा मिळाल्यानंतर होणारा दुसरा जन्म ‘नादज जन्म’ म्हणून ओळखला जातो. गुरूशिवाय ज्ञान अपूर्ण असून, जो अज्ञान दूर करून जीवनाला योग्य दिशा देतो तोच खरा गुरू असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरण पादुकांचे पूजन करण्यामागील आध्यात्मिक महत्त्वही त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले. गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त सकाळी ६ वाजल्यापासून श्री हरिधाम मंदिरातील पूज्य बापूजी समाधी मंदिरात पादुका पूजन, समाधी दर्शन, गुरु दीक्षा आणि अभिषेकाचे धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर ध्यान, प्रार्थना, सत्संग, सेवा समितीचा सत्कार, मान्यवरांचा गौरव तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. महाआरती आणि महाप्रसादाने या भक्तिमय कार्यक्रमाची सांगता झाली.

या सोहळ्यास मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख रामेश्वर नाईक, आमदार अमोल जावळे, विधान परिषद आमदार नंदकिशोर महाजन, इंदूरचे माजी आमदार सत्यनारायण पटेल, मुंबईचे मुलचंद जैन, माजी खासदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार शिरीष चौधरी, झिरण्याच्या आमदार झुमा सोळंकी, नंदा ब्राह्मणे, ताराचंद पटेल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने रावेरच्या तहसीलदार दीपा जेधे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, गटविकास अधिकारी तसेच विविध आश्रमांचे संत-महंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फुलसिंग जाधव यांनी केले.


Protected Content

Play sound