धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त धरणगाव येथील क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्था संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करत वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मार्गदर्शक दगडू सूर्यवंशी होते. गुरु वंदना आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी शिक्षकांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट करत गुरु हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे प्रेरणास्थान असल्याचे सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडत असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचा विशेष संदेश देण्यात आला. पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक दगडू आनंदा सूर्यवंशी यांनी शाळेसाठी वड, पिंपळ, नीम आणि शिसम या वृक्षांची रोपे भेट म्हणून प्रदान केली. गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेच्या परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपणात सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करण्याची शपथ घेत भविष्यात पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष भाईदास सोनवणे, शाळेचे मार्गदर्शक दगडू सूर्यवंशी, एम. एच. चौधरी, मुख्याध्यापक अमोल जाधव, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन वाघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुवर्णा महाजन यांनी मानले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुरुजनांविषयी आदरभाव, संस्कारमूल्यांची जपणूक आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली. गुरु-शिष्य परंपरेसोबतच निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला.



