धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त धरणगाव येथील श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयात विविध सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण आणि पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. बी. पाटील, मुख्याध्यापक एस. एस. पाटील आणि पर्यवेक्षक डी. आर. चव्हाण यांच्या हस्ते भारतमाता, महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. जयंतीचे औचित्य साधून शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत विद्यार्थ्यांनी धरणगाव शहरातील विविध भागांत स्वच्छता मोहीम राबविली. बाजारपेठ परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर, बसस्थानक, नगरपालिका परिसर तसेच विविध चौकांमध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छता करून परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला.

स्वच्छता मोहिमेसोबतच विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविले. दैनंदिन जीवनात स्वच्छतेची सवय, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी याबाबत पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. यावेळी शाळेतील सांस्कृतिक समितीचे ज्येष्ठ सदस्य ए. एच. पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याची तसेच त्यांच्या विचारांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. गांधीजींच्या स्वच्छतेच्या विचारांसोबतच शास्त्रीजींच्या साधेपणा, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समितीप्रमुख सागर पाटील, के. के. चव्हाण, एस. एस. देसले, पी. एस. गजरे, जे. एस. बोरसे, व्ही. एल. मोरे आणि पी. पी. रोकडे यांनी परिश्रम घेतले. तसेच पथनाट्य आणि स्वच्छता अभियानासाठी स्वच्छता समितीप्रमुख के. एम. माळी, डी. एन. चौधरी, आर. पी. पवार, एन. बी. ठाकरे, पी. व्ही. पाटील, एस. व्ही. तारे, एस. एस. देसले, शितल वानखेडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी सहकार्य केले.



