नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांवर मोठा परिणाम झाला असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यातील दुष्काळग्रस्त भागाबाबत निर्णय घेतला असून, त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. जळगाव तालुक्याचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश असल्याने आता शेतपिकांच्या नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.
शासनाच्या निर्णयानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पीक पाहणी व पंचनामा करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यानंतर गावनिहाय शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार जळगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये पंचनाम्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक गावासाठी ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी व कर्मचारी शेतशिवारात प्रत्यक्ष पाहणी करून पिकांची स्थिती, पिकांचे नुकसान आणि दुष्काळसदृश्य परिस्थितीची नोंद घेत आहेत. नशिराबाद परिसरात ग्राम महसूल अधिकारी रुपेश ठाकूर, सहाय्यक कृषी अधिकारी मनीषा कोंगे, ग्रामपंचायत अधिकारी पल्लवी मोरे आणि पीक पाहणी सहाय्यक संतोष कोळी यांच्या माध्यमातून पीक पाहणी व पंचनाम्याचे काम सुरू आहे. नशिराबाद शिवारातील विविध भागांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे. पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम, पिकांची सद्यस्थिती आणि संभाव्य नुकसान याची नोंद पंचनाम्यात करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या दुष्काळ अनुदानासाठी पंचनाम्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, दुष्काळ अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आधार कार्ड, फार्मर आयडी, बँक पासबुक यासह आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. संबंधित शेतकऱ्यांनी कागदपत्रांसह तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाने दिलेली ओढ, खरीप पिकांवर झालेला परिणाम आणि वाढलेल्या आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या पंचनाम्यांकडे नशिराबादसह परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पंचनाम्याच्या आधारे पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळी मदतीचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.



