जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील एनपीटीईएल-स्वयंम ऑनलाइन अभ्यासक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. विविध तांत्रिक आणि संगणकीय अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी गोल्ड व सिल्वर मेडल प्राप्त करून संस्थेचा नावलौकिक उंचावला आहे.
देशातील प्रतिष्ठित ऑनलाइन शिक्षण उपक्रम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एनपीटीईएल-स्वयंम अभ्यासक्रमांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. विशेषतः क्लाउड कॉम्प्युटिंग या अभ्यासक्रमात एमसीए द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदविली. निकिता किरण तयाडे यांनी ७८ गुण मिळवत ‘इलाईट प्लस सिल्वर मेडल’ प्राप्त केले, तर चौधरी सर्वेश विलास यांनी ७५ गुण मिळवत त्याच श्रेणीतील यश संपादन केले.

‘जॉय ऑफ कॉम्प्युटिंग युझिंग पायथॉन’ या लोकप्रिय अभ्यासक्रमातही विद्यार्थ्यांनी विशेष यश मिळविले. स्वाती संजय बाविस्कर यांनी तब्बल ९२ गुण मिळवत ‘इलाईट प्लस गोल्ड मेडल’ पटकावले. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संस्थेचा अभिमान अधिक उंचावला आहे. याच अभ्यासक्रमात विनोद सुखलाल महाजन यांनी ८४ गुण, भूमिका बालू नाळे यांनी ८० गुण, मनोज विश्वास पाटील यांनी ७७ गुण आणि नयना संजय बारी यांनी ७६ गुण मिळवत ‘इलाईट प्लस सिल्वर मेडल’ प्राप्त केले. या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रशांत वारके यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. सातत्यपूर्ण अभ्यास, स्व-अभ्यासाची सवय, आधुनिक तंत्रज्ञानाची आवड आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांनी हे यश मिळविल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भविष्यातही अशाच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले कौशल्य वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले. संस्थेतील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी शिक्षणाबरोबरच अतिरिक्त कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. एनपीटीईएलसारख्या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार ज्ञान आणि कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.



