Home उद्योग ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा ; 3 कोटी रुपयांच्या ठेवी परताव्याला सुरुवात

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा ; 3 कोटी रुपयांच्या ठेवी परताव्याला सुरुवात

0
11

सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या ठेवी परताव्याच्या प्रश्नावर महत्त्वपूर्ण निर्णय घेत सुमारे 3 हजार शेतकऱ्यांच्या जवळपास 3 कोटी रुपयांच्या ठेवी परत करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. मंत्री समितीच्या निर्णयानुसार ऊस बिलातून कपात करण्यात आलेल्या प्रति टन 50 रुपये ठेवीच्या परताव्यासंदर्भात गुरुवारी संभाजीनगर येथील उपसंचालक साखर आयुक्त कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

सहसंचालक साखर यांच्या कार्यालयात आयोजित बैठकीत जमा असलेल्या ठेवींचा आढावा घेण्यात आला. यावेळी सुमारे 3 हजार शेतकऱ्यांच्या जवळपास 3 कोटी रुपयांच्या ठेवी परत करण्यासाठी आवश्यक यादीला मंजुरी देण्यात आली. तसेच पहिला हप्ता अदा करण्यासाठी धनादेशही संबंधित यंत्रणेला प्रदान करण्यात आला. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून आपल्या पैशांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या या प्रश्नासाठी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा आणि संघर्ष सुरू होता. विविध स्तरांवर निवेदने, बैठका आणि आंदोलनांच्या माध्यमातून हा विषय शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता. अखेर या प्रयत्नांना यश मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. बैठकीदरम्यान उर्वरित सुमारे 10 कोटी रुपयांच्या ठेवीची रक्कम शेतकऱ्यांना व्याजासह परत मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. यासाठी महसूल वसुली प्रमाणपत्र (RRC) प्रक्रिया राबविण्याचे आश्वासन उपसंचालक साखर यांनी दिले आहे. त्यामुळे उर्वरित रक्कम मिळण्याचा मार्गही लवकरच मोकळा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ज्या शेतकऱ्यांना अद्याप त्यांच्या ठेवीची रक्कम प्राप्त झालेली नाही, त्यांनी संबंधित साखर कारखान्याशी संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन आवश्यक माहिती घ्यावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. परताव्याची प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.या बैठकीस माजी नगराध्यक्ष नीलेश राणे, उपसंचालक साखर ठाकूर मॅडम, अवसायक मधुकर साखर कारखान्याचे बलसाने साहेब, वायकोले साहेब तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले.


Protected Content

Play sound