Home उद्योग मोठी बातमी ; लोकआंदोलनाचा विजय ! वसंत सहकारी साखर कारखान्याचा लिलाव...

मोठी बातमी ; लोकआंदोलनाचा विजय ! वसंत सहकारी साखर कारखान्याचा लिलाव अखेर रद्द 

0
45

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील कासोदा (वनकोठे) येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या प्रस्तावित लिलावाला अखेर स्थगिती मिळाल्याची माहिती समोर आली आहे. कारखान्याच्या लिलावाविरोधात शेतकरी, भागधारक, कर्मचारी आणि विविध सामाजिक संघटनांनी उभारलेल्या तीव्र लोकआंदोलनामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा छत्रपती शिवाजी ब्रिगेडने केला आहे. त्यामुळे कारखान्याशी संबंधित हजारो भागधारक आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून वसंत सहकारी साखर कारखान्याचा विक्रीसाठी लिलाव जाहीर करण्यात आला होता. या निर्णयाला कारखान्याचे सुमारे १४ हजार भागधारक, कर्मचारी आणि स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला होता. लिलाव प्रक्रियेमुळे शेतकरी व भागधारकांचे मोठे नुकसान होणार असल्याचा आरोप करत संबंधितांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. दि. २३ जुलै २०२६ रोजी कासोदा येथे कारखान्याच्या प्रस्तावित विक्रीविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी, कामगार, भागधारक तसेच विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवत लिलाव प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची मागणी केली होती. आंदोलकांनी कारखान्याची विक्री अन्यायकारक आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप करत प्रशासनाकडे तीव्र निषेध नोंदविला.

छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी, भागधारक, कामगार आणि सामाजिक संस्थांच्या एकजुटीच्या दबावामुळे अखेर संबंधित यंत्रणेला लिलाव प्रक्रिया रद्द करावी लागली. हा निर्णय म्हणजे लोकशक्तीचा विजय असून, कारखान्याशी संबंधित सर्व घटकांच्या संघर्षाला मिळालेले यश असल्याचे त्यांनी नमूद केले. या निर्णयामुळे कारखान्याशी निगडित हजारो शेतकरी, भागधारक आणि कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पुढील काळात कारखान्याच्या भवितव्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन शेतकरी आणि भागधारकांच्या हिताचे संरक्षण करण्यात यावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound