Home उद्योग मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम ; भुसावळ-दादरसह अनेक रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द

मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम ; भुसावळ-दादरसह अनेक रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द

0
11

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भुसावळ, दादर, उधना, सूरत आणि अमरावती मार्गावरील अनेक गाड्या २४ व २५ जुलै २०२६ रोजी पूर्णतः रद्द करण्यात आल्या असून, प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलै २०२६ रोजी गाडी क्रमांक ०९०५० भुसावळ–दादर विशेष, २०९२५ सूरत–अमरावती एक्सप्रेस, १९१०५ उधना–भुसावळ एक्सप्रेस आणि १९१०६ भुसावळ–उधना एक्सप्रेस या सर्व गाड्या त्यांच्या प्रारंभिक स्थानकांवरून पूर्णतः रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गांवर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.

तसेच २५ जुलै २०२६ रोजी गाडी क्रमांक २०९२६ अमरावती–सूरत एक्सप्रेस, ०९०५१ दादर–भुसावळ विशेष आणि ०९०५२ भुसावळ–दादर विशेष या गाड्याही पूर्णतः रद्द करण्यात आल्या आहेत. सततच्या मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गांवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती अधिकृत माध्यमांवर तपासण्याचे आवाहन केले आहे. गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, हवामानातील परिस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतले जातील, असेही सांगण्यात आले आहे.


Protected Content

Play sound