Home क्राईम पाळधी बायपासवर भीषण तिहेरी अपघात ; आयशर चालक गंभीर, एसटी चालक-वाहकांसह प्रवासी...

पाळधी बायपासवर भीषण तिहेरी अपघात ; आयशर चालक गंभीर, एसटी चालक-वाहकांसह प्रवासी जखमी

0
9

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी बायपासजवळ शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघातात आयशर चालक गंभीर जखमी झाला असून, जळगाव-शिरपूर एसटी बसचे चालक, महिला वाहक (कंडक्टर) आणि चार ते पाच प्रवासी जखमी झाले आहेत. कोळशाने भरलेला ट्रोला, एसटी बस आणि आयशर यांच्यात झालेल्या या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ट्रोला चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

प्राथमिक माहितीनुसार, जळगावहून धरणगावच्या दिशेने कोळशाने भरलेला ट्रोला जात असताना त्याला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मागून येणारी जळगाव-शिरपूर एसटी बस समोरून येणाऱ्या आयशर वाहनाला धडकली. या धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की, आयशरचे मोठे नुकसान झाले असून चालक गंभीर जखमी झाला. अपघात होताच ट्रोला चालकाने प्रसंगावधान राखत आपले वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला उतरविले. त्यामुळे ट्रोला आणि एसटी बस यांच्यात आणखी मोठी धडक टळली. या तत्परतेमुळे बसमधील अनेक प्रवाशांचे प्राण वाचल्याचे घटनास्थळी उपस्थितांनी सांगितले. एसटी बसचे चालक, महिला वाहक तसेच चार ते पाच प्रवाशांना दुखापत झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातानंतर पाळधी बायपास मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. दोन्ही बाजूंना सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रणात आणण्याचे काम सुरू केले. यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हटविण्यात आली. जवळपास तासभराच्या प्रयत्नांनंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. पोलिसांनी अपघाताची नोंद करून नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे. या अपघातात मोठी जीवितहानी टळली असली तरी वाहतूक नियमांचे पालन, विशेषतः ओव्हरटेक करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. पोलिसांकडून अपघाताच्या सर्व बाजूंचा तपास करण्यात येत असून जखमींवर उपचार सुरू आहेत.


Protected Content

Play sound