Home Cities अमळनेर दबंग पोलिसिंगचा प्रत्यय ! दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला घरातून ताब्यात घेत चौकीपर्यंत...

दबंग पोलिसिंगचा प्रत्यय ! दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला घरातून ताब्यात घेत चौकीपर्यंत पायी आणले 

0
13

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील गांधीपुरा परिसरात नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध अमळनेर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी धाडसी कारवाई करत त्याला थेट राहत्या घरातून ताब्यात घेत गांधीपुरा पोलीस चौकीपर्यंत पायी आणले. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांच्या दबंग भूमिकेचे स्वागत केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश एकनाथ निकुंभ (उर्फ दादू धोबी) हा गांधीपुरा परिसरातील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाच्या प्रयत्नासह (कलम ३०७) विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामिनावर बाहेर असूनही परिसरात नागरिकांना चाकूचा धाक दाखवणे, धमकावणे, मारहाण करणे तसेच लूटमारीसारख्या प्रकारांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त होते. याबाबत अनेक तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी शुक्रवारी सकाळी सुमारे ११ वाजता पोलीस पथकासह राजेश निकुंभ याच्या राहत्या घरी धाड टाकली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत थेट गांधीपुरा पोलीस चौकीपर्यंत पायी आणले. या कारवाईमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आणि पोलिसांच्या कठोर भूमिकेचा संदेश सर्वदूर पोहोचला.

पोलीस चौकीत आणल्यानंतर संशयिताची कसून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान त्याच्याकडे कोणतेही हत्यार आढळून आले नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याला कायद्याचे पालन करण्याचा कडक इशारा देत भविष्यात कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी कृत्ये केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट समज दिली. या कारवाईनंतर गांधीपुरा परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांचा धाक कायम राहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अमळनेर पोलीस कठोर भूमिका घेत असल्याचा ठोस संदेश या कारवाईतून गेला असून, शहरात या दबंग पोलिसिंगची सर्वत्र चर्चा सुरू आहे.


Protected Content

Play sound