जिल्हा प्रशासनाला महावितरणाने खोटा अहवालावरून केली मोफत विद्युत संच मांडणी; पिंपरी पंचम पंचायतीचा विरोध

मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामपंचायत पिपरी पंचम अंतर्गत धाबे शिवारात व्यावसायिक गोडाऊन तसेच मंगल कार्यालयाला डी.पी.डी.सी अंतर्गत दिलेले सिंगल फेज कनेक्शन बेकायदेशीर असल्याने सदर काम तात्काळ बंद करण्याचा ठराव पिंपरी पंचम ग्रा.पं.मध्ये एक मताने घेण्यात आला आहे.

पिंपरी पंचम ग्रामपंचायती अंतर्गत धाबे शिवारात आरटीओ बेरिअर जवळ असलेल्या व्यावसायिक गोडवून, मंगल कार्यालय यांना विद्युत संच मांडणी मोफत मिळण्यासाठी महावितरणच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी सदर लाभार्थ्याशी आर्थिक हित संबंध साधून परिसरातील असलेले व्यावसायिक हॉटेल, तसेच सदर मंगल कार्यालय व गोडाऊन वर काम करणाऱ्या मजुर यांना रहिवासी दाखवून तसा खोटा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करून लाखो रुपयांचे काम जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर करून घेतले.

सदर कामाबाबत पिंपरी पंचम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सदर काम बंद करण्यासाठी वारंवार महावितरणाकडे तक्रारी केल्या जात आहे. परंतु महावितरणचे अधिकारी राजकीय दबावापोटी सदर तक्रारींना केराची टोपली दाखवत असल्यामुळे पिंपरी पंचम ग्रामपंचायतीमध्ये सदर काम बंद करण्यासाठी एकमताने ठराव घेण्यात आला असून याबाबत महावितरण तसेच जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार सदर लाभार्थी तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

Protected Content