नांदेडच्या रुग्णालयावर निष्काळजीपणाचा सुधाकर शिंदेंच्या भावाचा आरोप

मुंबई:वृत्तसंस्था । त्रिपुरा केडरचे आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे बंधू ज्ञानेश्वर शिंदे यांनी नांदेड येथील सरकारी रुग्णालयावर गंभीर आरोप केला आहे. नांदेडमध्ये सुधाकर यांना योग्य उपचार मिळाले नाहीत , अशा तीव्र भावना ज्ञानेश्वर यांनी व्यक्त केल्या.

सुधाकर शिंदे त्रिपुरामध्ये अर्थ विभागात सचिव पदावर होते. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात उमरा काशीद हे त्यांचे गाव असून ते १५ दिवसांच्या सुट्टीवर गावी आले होते. त्यांना सर्दी ताप असल्याने लगेचच नांदेड येथील गुरु गोविंदसिंग शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची तब्येत अधिकच खालावली. त्यानंतर त्यांना औरंगाबाद येथे हलवण्यात आले. मात्र तिथेही त्यांची प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्यांना पुणे येथील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच रुग्णालयात शिंदे यांचे शुक्रवारी निधन झाले.

शिंदे यांना करोना सदृष्य लक्षणे होती. त्यामुळे दोन वेळा त्यांची चाचणीही करण्यात आली. मात्र या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यानंतरही शिंदे यांचे निधन झाल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. पत्नी, तीन वर्षांचा मुलगा, वडील, चार भाऊ, तीन बहिणी असा शिंदे यांचा मोठा परिवार आहे.

शिंदे यांचे बंधू ज्ञानेश्वर यांनी नांदेडच्या रुग्णालायवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. नांदेडमध्ये त्यांना हवे तसे योग्य उपचार मिळाले नाहीत आणि तिथेच त्यांची प्रकृती ढासळली, असा आरोप त्यांनी केला. चांगलं रुग्णालय म्हणून आम्ही परभणीतून नांदेडला गेलो होतो पण आमची निराशा झाली. आम्हाला त्याची खूप मोठी शिक्षा भोगावी लागली. आमचा भाऊ आम्ही गमावला, अशा भावना व्यक्त करत ज्ञानेश्वर शिंदे यांनी एकंदर आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळपणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
. गरीब शेतकरी कुटुंबातून पुढे येत परिस्थितीवर मात करून त्यांनी शिक्षण घेतले होते. एमटेकचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे यूपीएससी परीक्षा देत ते आयएएस झाले.

Protected Content