धनाजी नाना महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेटना राज्य सरकारची शिष्यवृत्ती

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या दोन कॅडेटसना महाराष्ट्र सरकारची शिष्यवृत्ती बहाल करण्यात आली आहे.

१८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव अंतर्गत धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेचे युनिट सन १९६२ पासून कार्यरत असून त्यातील तुषार किशोर मोरे व दुर्गेश अशोक महाजन या दोन कॅडेटसना राज्य सरकारची स्कॉलरशिप नुकतीच बहाल करण्यात आली. त्यांचा सन्मान धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांच्या शुभहस्ते शिष्यवृत्तीच्या रकमेचा धनादेश व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.

यावेळी एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत उपस्थित होते. धनाजी नाना महाविद्यालयाचे राष्ट्रीय छात्र सेनेचे एकक अत्यंत सक्रिय असून सशस्त्र सेनेसोबत करिअरच्या विविध संधी कडेट्स ना उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांच्या आयुष्यात मोलाचा बद्दल घडवून आणण्यात अग्रेसर आहे. १८ महाराष्ट्र बटालियन एन सी सी जळगाव अंतर्गत धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर हे एकमेव महाविद्यालय आहे. जेथे ऑप्टिकल ट्रेनिंग कोर्स व फायरिंग रेंज असून आतापर्यंत पाच वेळेस वार्षिक प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन महाविद्यालयाने केले आहे. सद्यपरिस्थितीत कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटच्या माध्यमातून स्थानिक प्रशासन, डॉक्टर्स, सफाई कर्मचारी व कोरोना योद्धा यांना सर्वोतोपरी सहकार्य करून समाजसेवेचे उत्तरदायित्व निभावले आहे.

शिष्यवृत्ती वाटप प्रसंगी एनसीसी अधिकारी डॉक्टर राजेंद्र राजपूत यांनी आनंद व्यक्त करीत यापुढेही कॅडेटसना शारीरिक व मानसिक प्रशिक्षणासोबतच आर्थिक लाभ व करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जातील असे मत व्यक्त केले. याप्रसंगी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष आमदार शिरीषदादा चौधरी, उपाध्यक्ष डॉ सुधाकर काशिनाथ चौधरी, उपाध्यक्ष दामोदर हरी पाटील, चेअरमन लीलाधर विश्‍वनाथ चौधरी, व्हाईस चेअरमन प्रा. किशोर रामदास चौधरी, सचिव प्रा. मुरलीधर तोताराम फिरके, सदस्य प्रा. पी. एच. राणे, मिलिंद वाघुळदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी. आर. चौधरी, १८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावचे माजी समादेशक अधिकारी कर्नल सत्यशील बाबर, सध्याचे समादेशक अधिकारी कर्नल प्रवीण धीमन, सुभेदार मेजर कोमलसिंग, उपप्राचार्य डॉ उदय जगताप, उपप्राचार्य डॉ अनिल भंगाळे, उपप्राचार्य प्रा अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा दिलीप तायडे, सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक व अभिनंदन केले.

Protected Content