जवखेडेसीमसाठी दीड कोटी रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी-ना. पाटील

एरंडोल (प्रतिनिधी ) तालुक्यातील जवखेडेसीम गावासाठी तब्बल दीड कोटी रूपयांची तरतूद असणार्‍या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देण्यात येत असल्याची घोषणा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली. खडकेसीम आणि जवखेडासीम या परिसरात ना. गुलाबराव पाटील यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. तर आपल्या जुन्या मतदारसंघातील जनतेचे पंधरा वर्षानंतरही प्रेम कायम असल्याचे पाहून ना. गुलाबराव पाटील हे जुन्या आठवणीत रमल्याचे दिसून आले.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांचा जुना मतदारसंघ असणार्‍या खडकेसीम आणि जवखेडेसीम या गावांना आज भेटी दिल्या. येथील ग्रामस्थांनी त्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगी जवखेडेसीम येथील ग्रामस्थांशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला. याप्रसंगी सरपंचांनी मनोगत व्यक्त करतांना ग्रामस्थांचे व विशेष करून गावातील महिलांचे पिण्याच्या पाण्यासाठी खूप हाल होत असल्याचे सांगितले. याप्रसंगी महिलांना अश्रू अनावर झाले होते. गावकर्‍यांची ही समस्या ऐकून ना. गुलाबराव पाटील यांनी जवखेडेसीम गावासाठी दीड कोटी रूपयांची तरतूद असणार्‍या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देण्याची घोषणा केली. या योजनेचे काम लवकरच सुरू होणार असल्याची ग्वाही देखील दिली. उपस्थित ग्रामस्थांनी या घोषणेचे टाळ्यांच्या कडकटाटात स्वागत केले.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जवखेडेसीम हे एरंडोल तालुक्यातील असून हा माझा जुना मतदारसंघ आहे. पंधरा वर्षे होऊनही येथील लोक मला विसरले नाहीत ही बाब विलक्षण आहे. जनतेच्या प्रेमाचे आमचे नाते अतूट असून यातूनच आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळते. प्रेमाचे हे नाते भविष्यातही कायम राहिल. जवखेडेसीम गावासाठी पाणी पुरवठा योजनेसोबत व्यायामशाळा देखील मंजूर करण्यात येणार असल्याची घोषणा ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केली. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

या कामाचे झाले भूमीपुजन !

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जवखेडे सिम येथिल जि प शाळेच्या परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविणे, मागासवर्गीय वस्तीत भूमिगत गटार बांधकाम ,पुरातन ऐतिहासिक वास्तू चिरेबंदीच्या परिसरात संरक्षण भिंतीचे काम , गाव अंतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसविणे इ. ठिकाणी भूमिपूजन व उदघाटन करण्यात आले. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडून क्रियाशील पालकमंत्री म्हणून गौरव केला. सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते रविंद्र लांडगे यांनी केले तर प्रास्ताविक सरपंच दिनेश आम्ले पाटील यांनी गावाची पाण्याची समस्या असल्याने सोडविण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना साकडे घातले.

यावेळी आमदार किशोरआप्पा पाटील,जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने, जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, महिला जिल्हा संघटक महानंदा पाटील, प्रांताधिकारी विनायकुमार गोसावी, तालुका प्रमुख वासुदेव पाटील, राजेंद्र चव्हाण, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, जि प सदस्य नाना महाजन, सुनील पाटील, ग्रा प सदस्य छगन सोनवणे, माधवराव पाटील, गोपीचंद पाटील, सुभाष पाटील, मंगलसिंग चव्हाण, मनिष चौधरी यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

इयत्ता चौथीतील संकेत पाटील या विद्यार्थ्यांने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वागत केले.

Protected Content