भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरात सोमवारी रात्रीपासूनच उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. मध्यरात्री बारा वाजता फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात शहर दुमदुमून गेले. संपूर्ण शहर निळ्या रंगाने सजविण्यात आले असून ठिकठिकाणी जयभीमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
भुसावळ शहरातील स्टेशन रोड परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ सकाळपासूनच मोठ्या संख्येने अनुयायी दाखल झाले होते. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत बाबासाहेबांना अभिवादन केले. शहरात सर्वत्र शांतता, शिस्त आणि उत्साहाचे दर्शन घडत होते.

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या वतीने भव्य लॉंग मार्च काढण्यात आला. हा मार्च शहरातील प्रमुख मार्गांवरून जात स्टेशन रोडवरील पुतळ्याजवळ पोहोचला. येथे मंत्री संजय सावकारे, सर्व नगरसेवक, मनोज बियाणी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी जयभीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष सौ. गायत्री भंगाळे, कामगार नेते जगन सोनवणे तसेच सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांनी देखील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहरातील विविध भागांत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला.
रिपाईचे नेते राजू सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून संविधान पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. नागरिकांमध्ये संविधानाविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. याच वेळी कामगार नेते जगन सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले.
एकूणच संपूर्ण दिवसभर भुसावळ शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अत्यंत उत्साहात, शांततेत आणि सर्वपक्षीय एकोप्याच्या वातावरणात साजरी करण्यात आली.



