Home आरोग्य सरकारच टाळकं ठिकाणावर आहे का ?

सरकारच टाळकं ठिकाणावर आहे का ?

0
5

सध्या वैद्यकीय क्षेत्रात एक मोठा वाद पेटला आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) मध्ये होमिओपॅथी (BHMS) डॉक्टरांच्या नोंदणीला मॉडर्न मेडिसिन (ॲलोपॅथी) प्रॅक्टिस करण्याला इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) तीव्र विरोध दर्शवला आहे. “रुग्णांना शॉर्टकट डॉक्टर्स नकोत,” अशी भूमिका घेत आयएमएने आंदोलनाचे हत्यार उपसणे साहजिकच आहे. पहा याबाबत माझे भाष्य !

‘पॅथी’ वेगळी, तर प्रॅक्टिस एकत्र कशी ?

केवळ ६ महिन्यांचे ट्रेनिंग देऊन आयपीएस (IPS) अधिकाऱ्याला थेट आयएएस (IAS) बनवता येऊ शकते का?
६ महिन्यांचा शॉर्टकट कोर्स करून सिव्हिल इंजिनीअरला इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरचा दर्जा देता येईल का?
६ महिन्यांच्या प्रशिक्षणाने बीएसएफ (BSF) कमांडो थेट पॅरा एसएफ (Para SF) बनू शकतो का, किंवा रेल्वे चालकाला अचानक विमान चालवण्याची परवानगी दिली जाऊ शकते का?
जर या सर्व क्षेत्रांमध्ये असे शॉर्टकट मान्य नसतील, तर माणसाच्या ‘आयुष्याशी’ थेट संबंध असलेल्या वैद्यकीय क्षेत्रात असा ६ महिन्यांचा आधुनिक औषधशास्त्राचा (Modern Pharmacology / CCMP) कोर्स करून होमिओपॅथी डॉक्टरांना आधुनिक वैद्यकीय उपचारांची परवानगी देणे कितपत योग्य?

मॉडर्न मेडिसिन (MBBS) आणि होमिओपॅथी (BHMS) हे दोन पूर्णपणे भिन्न वैद्यकीय प्रवाह आहेत:

दोन्ही कोर्सेसची प्रवेश प्रक्रिया (Admission) नीट (NEET) परीक्षेतील गुणांच्या तीव्र स्पर्धेवर आधारित असते. सर्वाधिक गुण मिळवणारे विद्यार्थी साडेपाच वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर एमबीबीएस पदवी मिळवतात.

विचारसरणी व तत्त्व: होमिओपॅथीची उपचारात्मक विचारसरणी ‘सदृशः सदृशं शमयति’ (Like cures like) या तत्त्वावर चालते, तर मॉडर्न मेडिसिन हे पूर्णपणे वैज्ञानिक पुरावे (Evidence-based medicine) आणि आधुनिक औषधशास्त्रावर आधारलेले आहे.
स्वतंत्र कौन्सिल: होमिओपॅथी डॉक्टरांच्या नियमनासाठी आधीच स्वतंत्र ‘होमिओपॅथी कौन्सिल’ अस्तित्वात असताना, त्यांचा समावेश ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’ (MMC) मध्ये करणे अनावश्यक आणि कायदेशीरदृष्ट्या विसंगत आहे.

छुप्या मार्गाने ‘मिक्सोपॅथी’चा डाव?

आयएमएच्या मते, सरकारचा हा निर्णय एकतर्फी, घाईघाईचा आणि अत्यंत संशयास्पद आहे. ठिकठिकाणी खाजगी होमिओपॅथी कॉलेजेस उघडून, त्यातील विद्यार्थ्यांना छुप्या मार्गाने (Backdoor entry) मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस करण्याचा अधिकार देण्याचा हा काही व्यावसायिक आणि राजकीय घटकांचा डाव असल्याचा आरोप होत आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्राचे ‘पावित्र्य’ धोक्यात येईल आणि रुग्णांच्या आरोग्याशी खेळ होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

जनसामान्यांचा हक्क आणि रुग्णहित

प्रत्येक नागरिकाला आणि रुग्णाला आपल्याला नक्की कोणत्या ‘पॅथी’चे उपचार हवे आहेत, हे जाणून घेण्याचा आणि निवडण्याचा पूर्ण हक्क आहे. एखाद्या डॉक्टरच्या पाटीवर ‘BHMS’ पाहून रुग्ण होमिओपॅथी उपचारांसाठी जातो, मात्र तिथे जर आधुनिक (ॲलोपॅथी) औषधे दिली जात असतील, तर ती रुग्णाची फसवणूक आहे. जर होमिओपॅथी डॉक्टरांना मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस करायचीच असेल, तर त्यांनी रीतसर एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण करावा, हाच कायदेशीर आणि तर्कशुद्ध मार्ग आहे.

सरकारला कोणाचं भलं करायचं आहे ?

खरंच हे जनतेचे सरकार आहे का? जनतेच्या आरोग्याशी सरकार का खेळत आहे. उलट अशी रचना रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण करू शकते. प्रत्येक पॅथीचे स्वतःचे एक महत्त्व आणि मर्यादा आहेत. मूठभर लोकांच्या हितासाठी संपूर्ण महाराष्ट्र वेठीस का धरत आहे?

आता होमिओपॅथी उपचार पद्धतीवर विश्वास उरला नाही का ?

होमिओपॅथीची संपूर्ण उपचार पद्धती ७ मुख्य तत्त्वांवर (Seven Cardinal Principles) आधारित आहे,हि तत्वे अभ्यासत होमिओपॅथी डॉक्टर रुग्ण उपचार करतात.तर मग जी पॅथी शिकण्यासाठी 5,6 वर्ष लागतात,त्यावर आता विश्वास उरला नाही का?हा होमिओपॅथी चा अपमान नाही का? होमिओपॅथीनुसार, प्रत्येक मानवी शरीरात एक अदृश्य, जिवंत ऊर्जा असते, ज्याला ‘व्हाइटल फोर्स’ (Vital Force) किंवा चैतन्य शक्ती म्हणतात. त्या चैतन्य शक्तीचा हा अवमान नाही का?तुम्ही होमिओपॅथीचे जनक डॉ. ख्रिश्चन फ्रीड्रिख सॅम्युएल हानेमानयांचे शिष्य असून अभिमानाने तुम्ही सरकारला ठणकावून सांगितले पाहिजे,आमचा आमच्या पॅथी वर पूर्णपणे विश्वास आहे.त्यामुळे आम्हाला ही सरकारी खैरात नको, पण उभ्या महाराष्ट्रात असा कोणी उभा राहील का?

आयएमएवर आपला एकहाती अंकुश हवा ?

हो,आयएमए वर आपला एकहाती अंकुश हवा? म्हणून सरकार हे उपद्व्याप करत आहे. आधी महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनची निवडणूक स्थगित केली, मग निवडणूक झाली तेव्हा निकाल काय आला,हे सर्व समोर आहे. आता निवडणूक रद्द करण्याचा प्रयत्न सुरू असून सर्व उमेदवार हे आता निवडले जातील,(Selected Not Elected )त्यामुळे आपल्या मर्जीनुसार हाजी हाजी करणारे या असोसिएशन वर हवं,म्हणून ही 6 महिन्यांची गर्भधारणा…!

विशेष म्हणजे,सर्वच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आजरी पडले की ॲलोपॅथी कडेच वळतात,तरी हा कात्रज चा घाट कशासाठी? ॲलोपॅथी याचं स्वतंत्र अस्तित्व आहे तसेच होमिओपॅथी चे पण स्वतंत्र अस्तित्व आहे, मग ही घुसखोरी कशासाठी?)
वा रे वा,सरकार, तेव्हा खरंच म्हणावे वाटतं, सरकारच टाळक ठिकाणावर आहे का?

डॉ. नितु पाटील,
8055595999
भुसावळ


Protected Content

Play sound