Home Cities जळगाव जळगावात ‘बहुजन वॉलिंटियर फोर्स’तर्फे महामानवला अनोखी मानवंदना

जळगावात ‘बहुजन वॉलिंटियर फोर्स’तर्फे महामानवला अनोखी मानवंदना


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज जळगाव शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जळगाव रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी विविध संघटनांनी एकत्र येत एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते.

मंगळवारी, १४ एप्रिल रोजी सकाळी ठीक ११ वाजता बहुजन वॉलिंटियर फोर्स (BVF), बामसेफ, बहुजन क्रांती मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने महामानवाला अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे बँड पथकाचे सादरीकरण. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने बँड पथकाने विविध भीमगीतांच्या धून वाजवून बाबासाहेबांना अनोखी मानवंदना दिली. या संगीतमय सादरीकरणामुळे रेल्वे स्थानक परिसर भारावून गेला होता.

यावेळी संघटनांचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हाच या आयोजनामागचा उद्देश आहे,” अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

पुष्पहार अर्पण केल्यानंतर उपस्थितांनी डॉ. बाबासाहेबांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला. या सोहळ्यासाठी जळगाव शहर आणि परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात हा अभिवादन सोहळा पार पडला.


Protected Content

Play sound