जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याबाबत नंदुरबार येथील विजय चौधरी यांनी केलेल्या आक्षेपार्ह आणि अश्लील वक्तव्याचे तीव्र पडसाद जळगाव जिल्ह्यात उमटू लागले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ भोरगाव लेवा पाटीदार ठाणा पाडळसे विभागीय कार्यालयाच्या वतीने जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करण्यात आले असून, विजय चौधरींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची जोरदार मागणी सकल लेवा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
नंदुरबार येथील विजय चौधरी आणि एका व्यक्तीदरम्यान झालेल्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये, समाजाच्या ज्येष्ठ नेत्या व महिला लोकप्रतिनिधींविरोधात अत्यंत अश्लील, अवाच्य आणि घाणेरड्या भाषेचा वापर करण्यात आला होता. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण लेवा पाटीदार समाजात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. या विकृत मानसिकतेचा निषेध करण्यासाठी भोरगाव लेवा पाटीदार ठाणा पाडळसेचे अध्यक्ष विष्णू रा. भंगाळे, सचिव डॉ. प्रशांत वारके, कोषाध्यक्ष प्रभात चौधरी, कुटुंबप्रमुख ललीत रमेश पाटील यांच्यासह समाजातील मान्यवरांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

संबंधित निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची नैतिक व सामाजिक जबाबदारी आहे. राजकीय मतभेद असू शकतात, परंतु कोणत्याही महिलेचा अपमान, चारित्र्यहनन आणि तिच्याबद्दल अश्लील भाषेचा वापर करणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. “महिलांचा अपमान करणाऱ्यांना समाजाने कधीही माफ करू नये, महिलांचा सन्मान हा आमचा स्वाभिमान आहे!” अशा शब्दांत समाजाने आपला रोष व्यक्त केला आहे. अशा विकृत मानसिकतेचा धिक्कार करत, नंदुरबार येथील विजय चौधरी यांच्या कॉल रेकॉर्डिंगची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
महिला लोकप्रतिनिधींचा अनादर करणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात संपूर्ण लेवा पाटीदार समाज एकवटला असून, याप्रकरणी लवकरात लवकर कठोर पावले न उचलल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.



