Home Cities जळगाव जनरेटिव्ह एआय ते क्वांटम कॉम्प्युटिंग; गोदावरी अभियांत्रिकीतील पाच दिवसीय एफडीपी ठरला ज्ञानवर्धक

जनरेटिव्ह एआय ते क्वांटम कॉम्प्युटिंग; गोदावरी अभियांत्रिकीतील पाच दिवसीय एफडीपी ठरला ज्ञानवर्धक

0
9

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (स्वायत्त संस्था), जळगाव येथील संगणक अभियांत्रिकी विभागाच्या वतीने आयोजित “जनरेटिव्ह एआय अँड क्वांटम कॉम्प्युटिंग” या विषयावरील पाच दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (एफडीपी)चा उत्साहात समारोप करण्यात आला. देशभरातील तज्ज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील नव्या संधींबाबत सखोल मार्गदर्शन केले.

हा ऑनलाइन कार्यक्रम गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रेरणेने आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात देशातील नामांकित शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभाग घेत जनरेटिव्ह एआय, लार्ज लँग्वेज मॉडेल्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग तसेच विविध क्षेत्रांतील एआयच्या उपयोजनांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथील प्रा. प्रमोद बिडे यांनी जनरेटिव्ह एआयची मूलतत्त्वे स्पष्ट केली, तर डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आकुर्डी येथील डॉ. प्रीती पाटील यांनी शिक्षण, उद्योग आणि संशोधन क्षेत्रातील एआयच्या वापराबाबत माहिती दिली. दुसऱ्या दिवशी एल. आर. तिवारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. उमेश भदादे यांनी मल्टीमोडल एआय आणि आरएजी (RAG) आर्किटेक्चरवर, तर न्युटॅनिक्स प्रा. लि.चे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी मयूर पाटील यांनी एआय एजंट्स आणि उद्योग क्षेत्रातील त्यांच्या व्यावहारिक उपयोगांवर मार्गदर्शन केले.

तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी क्वांटम कॉम्प्युटिंगवरील विशेष सत्रांमध्ये क्यूबिट्स, सुपरपोझिशन, एन्टँगलमेंट, क्वांटम गेट्स, ग्रोव्हर आणि शोर अल्गोरिदम, क्वांटम क्लाउड कॉम्प्युटिंग, सायबर सुरक्षा आणि भविष्यातील संशोधनाच्या संधी यांचा सखोल आढावा घेण्यात आला. अंतिम दिवशी डॉ. विजय ए. कोतकर यांनी उदयोन्मुख तंत्रज्ञान, नवउद्योजकता, उद्योग-अभ्यासक सहकार्य आणि करिअरच्या नव्या संधींवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संयोजन प्रा. निलेश एस. वाणी, सहसंयोजन प्रा. प्रशांत शिंपी आणि समन्वय डॉ. निलेश वाय. चौधरी यांनी केले. प्रा. शिरीन पिंजारी यांनी आभार मानले. यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी संगणक अभियांत्रिकी विभागाचे अभिनंदन केले.


Protected Content

Play sound