पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरात सामाजिक एकोपा, बंधुता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणारे विराट हिंदू संमेलन उद्या, बुधवार दि. १५ रोजी रात्री ८ वाजता आझाद चौक येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणून सामाजिक समरसतेचा संदेश देण्याचा उद्देश आयोजकांनी व्यक्त केला आहे.
सकल हिंदू समाज आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळा, पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शहरात या संमेलनाबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. समाजातील जात, पात, धर्मभेद दूर करून एकत्रिकरणाची भावना दृढ करणे तसेच समाजात बंधुता आणि ऐक्य वाढवणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

या संमेलनाला धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. मठाधिपती ब्रह्मचारी संस्थान, उटी (जि. हिंगोली) येथील प.पू. सुरेश महाराज ब्रह्मचारी यांचा आशीर्वाद या कार्यक्रमास मिळणार असून त्यांची उपस्थिती विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून हिंदुराष्ट्र सेना अध्यक्ष धनंजय भाई देसाई उपस्थित राहणार असून ते आपल्या मार्गदर्शनातून सामाजिक एकता, राष्ट्रप्रेम आणि सांस्कृतिक मूल्यांवर प्रकाश टाकणार आहेत. त्यांच्या भाषणाकडे कार्यकर्त्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
आयोजकांनी पारोळा शहरातील सर्व नागरिकांना सहपरिवार या संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. समाजात सकारात्मक विचारांची रुजवणूक आणि एकतेचा संदेश पसरवण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.



