जळगाव जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कंजरभाट समाज युवा फाउंडेशनच्या वतीने जळगाव रेल्वे स्थानक परिसरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.
अभिवादन प्रसंगी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीसोबतच भारतीय संविधान निर्मितीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाची माहिती दिली. समाजात समता, बंधुता आणि न्याय ही संविधानिक मूल्ये रुजवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसेच, बाबासाहेबांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.

या कार्यक्रमाला फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश बागडे, सचिव राहुल नेतलेकर यांच्यासह वीर दहियेकर, संदीप गारुंगे, गणेश बागडे, कार्तिक बाटूंगे आणि राहुल दहियेकर यांसह समाजातील अनेक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत ‘जय भीम’च्या घोषणेत परिसर दणाणून सोडला होता.



