Home Cities जळगाव जळगावात अतिक्रमण विभागाची कारवाई; रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या १२ व्यावसायिकांवर कारवाई

जळगावात अतिक्रमण विभागाची कारवाई; रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या १२ व्यावसायिकांवर कारवाई

0
53

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सोमवारी सकाळी धडक कारवाई केली. जुन्या सानेगुरुजी रुग्णालयासमोरील परिसर तसेच मसाला गल्लीमध्ये रस्त्यावर व्यवसाय करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एकूण १२ व्यावसायिकांवर कारवाई करत १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

महापालिकेला नागरिकांकडून सातत्याने रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. विशेषतः जुन्या सानेगुरुजी रुग्णालयासमोरील परिसरात वाहनांना अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले होते. याची दखल घेत अतिक्रमण विभागाने सकाळी पावणे सात वाजल्यापासून विशेष मोहीम राबविली.

या कारवाईत जुन्या सानेगुरुजी रुग्णालयासमोर रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या आठ फुले व पान विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच जुन्या कापड बाजारातील मसाला गल्लीमध्ये रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या चार दुकानदारांकडून एकूण १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

ही कारवाई अतिक्रमण अधीक्षक संजय ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण निर्मूलन पथकाने केली. महापालिकेच्या या कारवाईमुळे काही काळ परिसरात हालचाल वाढली असली तरी वाहतुकीसाठी अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शहरातील सार्वजनिक रस्ते मोकळे ठेवण्यासाठी प्रशासनाने नियमितपणे अशा कारवाया कराव्यात, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.


Protected Content

Play sound