पालकमंत्र्यांच्या विकासकामांचे श्रेय लाटू नका – जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांचे आवाहन

भुसावळ/बोदवड प्रतिनिधी | “ना.गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विकासकामांचे इतरांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये याउलट विरोधकांनी गांभीर्याने विचार करत गावकुसात अपूर्ण असलेल्या सामूहिक हिताच्या आणि विकासाच्या योजना नावारूपास आणण्यासाठी प्रयत्न करावेत” असे शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी आवाहन केले आहे.

यासंदर्भात आवाहन करतांना समाधान महाजन यांनी सांगितले की, “महाराष्ट्र राज्यात महा विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून स्वच्छता व पाणीपुरवठा खाते हे शिवसेनेकडे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे आहे. त्यांनी पिण्याच्या पाण्याचे काम हाती घेत अनेक तालुक्यातील पाणी प्रश्न यशस्वीपणे सोडवले आहेत. बोदवड/भुसावळ तालुक्यातील ७९ गावांना मुक्ताईनगर ‘हतनूर’च्या जलसाठ्यातून नियमित पाणीपुरवठा होत आहे. तरीही या तालुक्यात अनेक गावे तहानलेली असून या यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील हे प्रयत्नशील आहेत. याचाच एक भाग म्हणून भुसावळ तालुक्यातील साकेगाव, कंडारी, भानखेडा, फेकरी किन्ही अशा गावाला करोडो रुपये पिण्याच्या पाण्यासाठी पालकमंत्र्यांनी मंजूर केलेले आहे. मात्र या यशाचे श्रेय लाटण्यासाठी अनेकांनी तालुक्यात केविलवाणी भाऊगर्दी चालवली आहे.

भुसावळ तालुक्यातीलच नाही तर जळगाव जिल्ह्यातील अनेक पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या खेड्यापाड्यात पाणीपुरवठ्याच्या मजबूत अशा योजना देण्याचे प्रयत्न प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे सुरू केले आहे. त्यात वरणगाव शहरासाठी गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून असलेला पिण्याच्या पाण्याचा आणि यासोबतच साकेगाव, कंडारी, भानखेडा, फेकरी, कंडारी, शिन्दी अशा गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे जातीने लक्ष घालून, पंधरा पंधरा वर्षाची सत्ता असलेल्याना जमले नाही ते अवघ्या दोन वर्षाच्या आपल्या कार्यकाळात पालकमंत्री ना.पाटील यांनी करून दाखवले असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणतात, “वरणगाव शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा योजनेचे २५ कोटी रुपये खर्चाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बोदवड शहराला तीस तीस दिवस पिण्यास पाणी मिळत नसताना तिथला पाणीपुरवठा सात दिवस केला, त्याचप्रमाणे भुसावळ तालुक्यातील साकेगाव, कंडारी, भानखेडा, फेकरी, शिन्दी अशा गावांना कायमस्वरूपी जलस्त्रोत निर्माण करण्यासाठी व महिला भगिनींचे तथा आबालवृद्धाचे मैलोगणती डोक्यावरून पाणी वाहून आणण्याचे कष्ट कायमचे दूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने फक्त जळगाव जिल्ह्यातच नाही तर राज्यभराततून पाणीपुरवठ्याच्या योजना हाती घेऊन अनेक योजनांची कामे पूर्णत्वाकडे पोहोचवलेली आहेत.

अशा आकारास आलेल्या विकास कामांचे व जनहीताच्या उपक्रमांचे श्रेय लाटण्यासाठी आता या भुसावळ परिसरात काही पुढार्‍यांची केविलवाणी भाऊगर्दी सुरू झाली आहे. या सर्व परिस्थितीचा विरोधकांनी गांभीर्याने विचार करत आपलं चिंतन करावे आणि आपली असेल असतील नसतील तेवढे प्रयत्न करून गावकुसात अपूर्ण असलेल्या सामूहिक हिताच्या आणि विकासाच्या योजना नावारूपास आणण्याचे प्रयत्न करावे. इतरांनी केलेल्या कार्याचे श्रेय लाटून घेण्याचे केविलवाणे प्रयत्न यापुढे थांबवावेत” असं शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी आवाहन केले आहे.

Protected Content