भ्रष्टाचार अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षपदी दिलीप सूर्यवंशी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भ्रष्टाचार व अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते दिलीप सुर्यवंशी यांची नियुक्ती करर्‍यात आली आहे.
एस टी महामंडळ जळगाव विभागातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज रोजी संपन्न झाली. या बैठकीत एसटी कर्मचार्‍यांना त्यांची कर्तव्य व अधिकार यांच्याबाबत समग्र मार्गदर्शन करण्यात आले. जळगाव विभागातील सुनावरी, अपील व सार्वजनिक जीवनातील इतर समस्यांबाबत जनजागृती करणे हेतू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासकीय कामात अडचणी निर्माण होत असतील, दप्तर दिरंगाई होत असेल, प्रशासकीय अन्याय होत असेल किंवा आर्थिक स्वरूपाची मागणी होत असेल तर नेमकं काय करायला हवं या संदर्भात दिलीपराव पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो, महाराष्ट्र ही महाराष्ट्र राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, १९८८ च्या कक्षेत येणार्‍या लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्थापन केलेली महाराष्ट्र सरकारची एजन्सी आहे. सार्वजनिक जीवन जगताना जर चुकीच्या पद्धतीने कोणीही अडवणूक करत असेल किंवा दलालांचा सुळसुळाट वाढला असेल तर या खात्याशी संपर्क करून आपली समस्या सुटू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होऊन एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढावे व भ्रष्टाचार व अन्याय मुक्त विभाग म्हणून जळगावची ख्याती सर्व दूर व्हावी या हेतूने प्रयत्न करण्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

दरम्यान, याप्रसंगी भ्रष्टाचार अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते दिलीप सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. सूचक म्हणून पांडुरंग सोनवणे तर अनुमोदक म्हणून अशोक सोनवणे यांनी आपली भूमिका बजावली. उर्वरित कार्यकारिणीची निवड करण्याचे सर्वाधिकार दिलीप सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन किरण धनगर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील विविध पदाधिकार्‍यांनी सहकार्य केले.

Protected Content