नौदलात पताका फडकावणारे भोकरे कुटुंब ! : दुसरी पिढी देखील सज्ज

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज-स्पेशल रिपोर्ट | आज राष्ट्रीय नौदल दिवस ! यानिमित्त नेव्ही आणि यात कार्यरत असलेल्यांच्या कार्याचा गौरव केला जात आहे. आज यानिमित्त आम्ही आपल्याला चाळीसगाव तालुक्यातील भोकरे कुटुंबाने नौदलात बजावलेल्या कामगिरीची माहिती करून देत आहोत.

मूळचे चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी असणारे सुनील भोकरे हे सेवानिवृत्त व्हाईस ऍडमीरल आहेत. नौदलातील दुसर्‍या क्रमांकाच्या पदावरून ते निवृत्त झालेले आहेत. त्यांचे माध्यमिक शिक्षण सातारा येथील सैनिक स्कूलमधून झाले. यानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएची परिक्षा उत्तीर्ण करून ते नौदलात रूजू झाले. १ जानेवारी १९८४ रोजी ते नेव्हीमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत झाले. त्यांना प्रारंभीच आयएनएस विक्रांत या युध्दनौकेवर काम करण्याची संधी मिळाली. यानंतर विविध पायर्‍या झपाट्याने चढत आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या कार्यक्षमतेची मोहर उमटवत ते नौदलात व्हाईस ऍडमीरल या पदापर्यंत पोहचले. नौदलातील हे दुसर्‍या क्रमांकाचे पद ! या पदावर कार्यरत असतांनाच ते ऑगस्ट २०२१ मध्ये सेवानिवृत्त झाले.

सुनील भोकरे हे नौदलाच्या पाणबुडी विभागातील तज्ज्ञ आहेत. आयएनएस सिंधुघोष, सिंधुध्वज व सिंधुशस्त्र या पाणबुड्यांचे तसेच आयएनएस बियास या फ्रिगेटचे सारथ्य त्यांनी केले होते. आयएनएस वज्रबाहू या पाणबुडी तळाचे ते प्रमुख होते. नौदलाच्या पश्चिम तळावरील पाणबुडी विभागाचे कमोडोर म्हणून तसेच पूर्व कमांडचे मुख्य स्टाफ ऑफिसर म्हणून त्यांनी जबाबदारी भूषविली होती. तर त्यांना आपल्या कारकिर्दीत अनेक सन्मानांनी विभूषीत करण्यात आले होते. यामध्ये अतिविशिष्ट सेवा पदक, युद्धसेवा पदक, नौसेना पदक आदींसह अन्य पदकांचा समावेश होता.

सर्वात लक्षणीय बाब म्हणजे सुनील भोकरे यांचे पुतणे तथा जळगाव येथे कृषी उपसंचालक पदावर कार्यरत असणारे अनिल भोकरे यांचे चिरंजीव अथर्व हे गेल्या वर्षीच एनडीएची परिक्षा उत्तीर्ण करून नौदलात सबलेप्टनंट या पदावर रूजू झाले आहेत. अर्थात, भोकरे कुटुंबातील पुढची पिढी देखील नौदलात रूजू झाली आहे. तर त्यांचे जावई विपुल रूपेरी हे देखील नौदलात अधिकारी आहेत. एकाच कुटुंबात नौदलातील तीन अधिकारी असा योग यातून जुडून आला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content