चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी मुद्देमालासह ताब्यात

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी शहरातील बस स्थानकाच्या पाठीमागे संचार करीत असल्याची गुप्त माहिती मिळताच शहर पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोकडसह ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील शांतीनगर येथील अजय पितांबर गेमनानी (वय-३७) हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्याला असून त्यांच्या मालकीची धिरज नावाची इलेक्ट्रीक दुकान आहे. या दुकानाच्या गोडावूनच्या भिंतीवरील खिडकीची गज तोडून अज्ञाताने २ लाख ३० हजार पाचशे रुपये किं.चा इलेक्ट्रिक साहित्य व रोकड एवढा मुद्देमाल लंपास केल्याची थरारक घटना २५ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता ते २६ नोव्हेंबर-२२ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात अजय पितांबर गेमनानी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानुसार पुढील तपास सुरू होता. मात्र वरील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी शहरातील बस स्थानकाच्या पाठीमागे संचार करीत असल्याची माहिती चाळीसगाव शहर पोलिसांना मिळाली. लागलीच पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. व त्यांच्याकडून वरील चोरीच्या १ हजार नऊशे रूपये घेऊन इतर ठिकाणांहून चोरी केलेल्या १० हजार रुपये रोख व ८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख १ हजार ९०० रूपये कि.चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यांची अधिक विचारपूस केली असता शहरात चार ते पाच ठिकाणी चोरी केल्याची कबुली दोघांनी दिली असून अकबर लुकमान खान (वय-२३) व आर्यान पप्पू शेख (वय-१८) दोघेही रा. दौला वडगाव ता. आष्टी जि. बिड असे संशयित आरोपीचे नावे आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन कापडणीस, सपोनि सागर ढिकले, पोना तुकाराम चव्हाण, पोना रविंद्र पाटील, पोना राहुल सोनवणे, पोकॉ अमोल भोसले, पोकॉ प्रकाश पाटील, पोकॉ दिपक चौधरी, पोकॉ मनोज तडवी, पोकॉ शरद पाटील, पोकॉ निलेश पाटील व पोकॉ रविंद्र बच्छा आदींनी केली आहे.

Protected Content