जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील भवानी फाटा परिसरात घडलेल्या एका भीषण अपघातात पहूर येथील रहिवासी असलेल्या दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत नरेंद्र वसंत बडगुजर (वय-४५) यांचा मृत्यू झाला असून, धडक दिल्यानंतर चालक आपले वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत नरेंद्र बडगुजर हे ३ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास आपली बजाज प्लॅटिना मोटारसायकल (क्र.एमएच-१९-ईक्यू ८३५४) घेऊन जामनेरकडून पहूरच्या दिशेने घरी निघाले होते. यावेळी, भवानी फाटा परिसरातील छत्रपती संभाजी नगर ते जळगाव महामार्गावर, मळपिंप्री शिवारात एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात नरेंद्र बडगुजर यांचा दुदैवी मृत्यू झाला.

या प्रकरणी मयताचे भाऊ रवींद्र वसंत बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.



