माहिती देण्यासाठी मागितली लाच : ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माहितीच्या अधिकारातील माहिती देण्यासाठी पंचविसशे रूपयांची लाच स्वीकारतांना तालुक्यातील गारखेडा-बाभळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने आज रंगेहात अटक केली आहे.

या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे गारखेडा येथील रहीवासी असून त्यांनी गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक अनिल नारायण गायकवाड यांचेकडे सदर ग्रामपंचायती मध्ये सन-२०१५ ते २०२० या कालावधी दरम्यान ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध योजनांच्या कामाचे झालेले लेखापरीक्षण बाबतची माहिती ही माहितीच्या अधिकाराचा अर्ज करून मागितलेली होती. संबंधीत माहिती ही वेळेत न मिळाल्याने तक्रारदार यांना सदर माहिती देण्याच्या मोबदल्यात गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष प्रथम ३,०००/रुपये व तडजोडीअंती २,५००/-रुपये लाचेची मागणी करुन सदर लाच मागणी केली होती.

दरम्यान, संबंधीत व्यक्तीने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. यानुसार आज सापळा रचून पंचविसशे रूपयांची रक्कम धरणगाव अमळनेर रोडवरील सिंधु ढाबा येथे पंचासमक्ष स्वतःस्विकारतांना अनिल नारायण गायकवाड, (वय-५०, ग्रामसेवक, गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय, ता.धरणगाव) यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.त्यांचे वर धरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपधिक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, पो.ना.बाळू मराठे, पो.ना.ईश्वर धनगर, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने केली.

Protected Content