दरोड्यातील मुख्य संशयिताला मध्यप्रदेशातून अटक; एलसीबीची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । भुसावळातील प्रौढाच्या दुचाकीस लाथ मारुन खाली पाडत तीघांनी मारहाण करीत सोन्याची चेन, मोबाईल व दहा हजार रुपयांची रोकड असा २ लाख ८५ हजार रुपयांची ऐवज लांबविणाऱ्या मुख्य संशयितास आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातून अटक केली आहे. 

आदर्श उर्फ डफली बाळु तायडे (वय २३, रा. न्यू आंबेडकर नगर भुसावळ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. अधिक माहिती अशी की संशयित आरोपी डफली याने दोन साथीदारांच्या मदतीने १९ एप्रिल रोजी साकेगाव (ता. भुसावळ) येथे राहणाऱ्या विनोद बजरंग परदेशी (वय ५१, साकेगाव) यांच्या धावत्या दुचाकीस लाथ मारुन त्यांना खाली पाडले. यानंतर त्यांना मारहाण केली. ही घटना साकेगा वेथील फार्मसी कॉलेजच्या मागे घडली होती. या दरोडेखोरांनी परदेशी यांच्या दोन सोन्याच्या चेन, मोबाईल व दहा रुपये रोख असा २ लाख ८५ हजार रुपयांचा एेवज लांबवला होता. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन्ही संशयित दुचाकीने बेपत्ता झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपणीय माहिती मिळाल्यानुसार यातील एक संशयित हा डफली असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर यापूर्वी देखील अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यानुसार पोलिसांनी माहिती काढण्यास सुरूवात केली. सहाय्यक फौजदार रा.का. पाटील, अशोक महाजन,  अनिल देशमुख, कमलाकर बागुल, सुरज पाटील, राजेंद्र पवार, दीपक चौधरी यांच्या पथकाने भुसावळाच चौकशी सुरू केली. दरम्यान डफली हा यावल येथील नातेवाईकाकडे गेल्याची माहिती मिळाली. पथक यावल येथे पोहाेचल्यानंतर त्याने तेथुनही पलायन केल्याची माहिती समोर आली. यानंतर पथक डफलीच्या मुळ गावी म्हणजेच बोरसल येथे पोहाचेले. यावेळी डफली हा घरातच मिळुन आला. त्याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी घरात लपवून ठेवलेली होती. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.