Home Cities जळगाव सभापती चंद्रशेखर पाटील यांचा अचानक पाहणी दौरा; आरोग्य केंद्रे, शाळांची तपासणी

सभापती चंद्रशेखर पाटील यांचा अचानक पाहणी दौरा; आरोग्य केंद्रे, शाळांची तपासणी


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती चंद्रशेखर शिवाजीराव पाटील यांनी मंगळवारी केलेल्या अचानक धडक पाहणी दौऱ्यामुळे मनपा प्रशासनात एकच खळबळ उडाली. शहरातील आरोग्य केंद्रे, महापालिकेच्या शाळा आणि प्रभाग समिती कार्यालयांची प्रत्यक्ष पाहणी करत सभापतींनी कामकाजाचा आढावा घेतला. या दौऱ्यात विविध ठिकाणी स्वच्छता, मूलभूत सुविधा, औषधसाठा आणि शिक्षण व्यवस्थेची तपासणी करून अधिकाऱ्यांना नागरिकाभिमुख सेवा दर्जेदार ठेवण्याचे कडक निर्देश देण्यात आले.

२९ एप्रिल रोजी सकाळी सुरू झालेल्या या पाहणी दौऱ्याची सुरुवात प्रभाग समिती क्रमांक २, ढाकेवाडी कार्यालयापासून झाली. कार्यालयीन कामकाज, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण आणि प्रशासनिक समन्वय याची माहिती घेत सभापतींनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी शहरातील महत्त्वाच्या आरोग्य केंद्रांना भेटी देत प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला.

राधाकृष्ण नगर येथील एस.डब्ल्यू.सी. दवाखाना, गणेशवाडीतील स्व. नानीबाई अग्रवाल दवाखाना आणि शिवाजीनगर येथील मनपा रुग्णालयात त्यांनी सेवा सुविधांची पाहणी केली. औषधांचा साठा, रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, स्वच्छता आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती याबाबत त्यांनी सखोल चौकशी केली. काही ठिकाणी त्रुटी निदर्शनास आल्यानंतर तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आरोग्य सेवांबरोबरच शिक्षण क्षेत्राकडेही सभापतींनी विशेष लक्ष केंद्रित केले. शाहूनगर येथील उर्दू शाळा क्रमांक १२, पोलीस लाईनमधील मनपा शाळा क्रमांक ५, ढाकेवाडी येथील शाळा क्रमांक ३८ तसेच शाळा क्रमांक ११ आणि ३२ येथे जाऊन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा, शाळांची स्वच्छता, वर्गखोल्यांची स्थिती आणि शैक्षणिक वातावरणाचा त्यांनी आढावा घेतला.

सुप्रीम कॉलनी येथील आरोग्य वर्धिनी केंद्रालाही त्यांनी भेट देत नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा आणि सुविधांची तपासणी केली. या दौऱ्यात शहर अभियंता योगेश बोरोले, उपायुक्त पंकज गोसावी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील सोनवणे उपस्थित होते. अधिकाऱ्यांसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा करत कामाच्या दर्जात कुठलीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा सभापतींनी दिला.

पाहणीदरम्यान नागरिकांशी संवाद साधत त्यांनी समस्या जाणून घेतल्या आणि मूलभूत सेवांबाबत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले. मनपा प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करून नागरिकांना चांगल्या सुविधा देणे हेच उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

या अचानक पाहणी दौऱ्यामुळे प्रशासनातील कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचा संदेश गेला असून, अधिकाऱ्यांमध्येही जबाबदारीची जाणीव निर्माण झाली आहे. नागरिकांच्या सुविधांसाठी अशा धडक दौऱ्यांची गरज असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound