दादा कोंडके यांचा गावरान मेवा ( व्हिडीओ )

मराठी मातीतला अस्सल हिरा, अगदी खराखुरा ओरिजनल नायक म्हणजे दादा कोंडके होत. आज त्यांचा स्मृती दिन. यानिमित्त दादांच्या चित्रपटातील निवडक गाणी अर्थात एका अर्थाने खास गावरान मेवा आपल्यासाठी सादर करत आहोत. खरं तर दादांची बहुतेक गाणी प्रचंड लोकप्रिय झाली असून यात डावे-उजवे करणे कठीण आहे. मात्र त्यातीत ही निवडक गाणी.

१) माळ्याच्या मळ्यात कोण ग उभी ? : दादा कोंडके यांच्या सोंगाड्या या पहिल्या सुपरहिट चित्रपटातील हे गाणे अजरामर झालेले आहे. विलक्षण ठेका, परिणामकारक शब्द आणि अर्थातच याला अभिनयाची जोड यात मिळाली आहे.

२) काय ग सखू : सोंगाड्यामधीलच काय ग सखू हे गाणेदेखील अतिशय नितांतसुंदर असेच आहे. डोईवर पाटी…पाटीत भाकरी । भाकरीवर तांब्या…तांब्यात दुध हाय गाईच…गाईच गं घेता का दाजीबा वाईच असे विलक्षण शब्दसौष्ठव आपल्याला भारून टाकते.

३) झाल्या तिन्ही सांजा : दादा हे विनोदवीर असले तरी त्यांच्या चित्रपटांमध्ये श्रुंगार हादेखील अविभाज्य घटक होता. याचा विचार करता तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील झाल्या तिन्ही सांजा हे गाणे अविट गोडीचे आहे. त्यांच्याच ओठांचा ओठी रंग लाल….आठवणीने त्यांच्या बाई रंगले हे गाल ॥ अर्थात फक्त आठवणींनी गाल रंगण्याची प्रेमाची अभिव्यक्ती यात दर्शविण्यात आलेली आहे.

४) अंजनीच्या सुता : प्रत्येक हनुमान जयंतीला हे गाणे गावोगावी, गल्ल्या-गल्ल्यांमध्ये ऐकू येते. यात अतिशय सोप्या मात्र गहन अर्थ असणार्‍या शब्दांमध्ये पवनपुत्र हनुमानाच्या स्तवनाला नायकाच्या जीवनातील हतबलतेची जोड देण्यात आलेली आहे. यातील शब्द, संगीत आणि चित्रीकरण हे सारेच सरस.

५) चल रं वाघ्या रडू नको : दादा कोंडके यांच्या चित्रपटातील हे करूणरसाने युक्त असणारे गाणे आपल्याला भावविभोर करून टाकते. मुक्या प्राण्याची सोबत ही कपटी मानवापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असल्याचा संदेश हे गाणे देते.

६) चंदनाचा पाटावर…: तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील हे गाणे अतिशय अफलातून असेच आहे. चंदनाच्या ताटावर…सोन्याच्या ताटामंधी…मोत्याचा घास भरवण्याचे रूपक हे दादांनाच सुचू जाणे ! या गाण्याचे चित्रीकरणदेखील सरस आहे.

७) आई माझ्या लग्नाची गं : एका मुग्ध बालिकेची भावना या गाण्यातून विलक्षण परिणामकारक पध्दतीत व्यक्त करण्यात आली आहे. याच्या चित्रीकरणात दादांची धमाल आपल्याला अनुभवायला मिळते.

८) ढगाला लागली कळं : दादांचे हे गाणे आजही सुपरहिट आहे. याचे अनेक व्हर्शन्स आलेत. अगदी याला नवीन संगीताचा साज चढवूनही सादर करण्यात आले असून याची लोकप्रियता अबाधित असल्याचे आपल्याला दिसून येते.

९) दौलत ही तीन लाखाची : ह्योच नवरा पाहिजे या चित्रपटातील हे गाणे दादांचा मराठी बाणा दर्शविणारे आहे. यातील नायिका ही आपल्या सख्याला जगभरातील विविध ठिकाणांचे, तेथील वस्तूंचे कौतुक सांगते. नायक मात्र मराठी मातीत यांचे समर्थ पर्याय तिला सुचवतो. शेवटी ती अजिंठा-वेरूळची लेणी पाहण्याची इच्छा व्यक्त करते तेव्हा नायिका ही याच लेण्यांमधली एक मूर्ती असल्याचे कौतुकोदगार त्याच्या मुखातून निघतात.

१०) मला लागलाय खोकला : अगदी साध्यासुध्या प्रतिमांमधून गाणे खुलवण्याची हातोटी दादांकडे होती. यामुळे थंडीचा महिला…शेकोटी…मधाच बोट आदींना एका गाण्यात गुंफण्याची किमया ते करू शकले.

११) अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो : बोली भाषेतील प्रचलीत असणार्‍या म्हणीला एका सुश्राव्य गाण्यात परिवर्तीत करण्यात दादा यशस्वी झाले आहेत. प्रत्यक्ष जीवनात दुर्जन हे सज्जनांपेक्षा अधिक सुखात असल्याचे आपण पाहतो. हाच विरोधाभास या गाण्यात मांडण्यात आला आहे. याचे चित्रीकरणदेखील अतिशय अफलातून असेच आहे.

१२) अंगात डगला कमरंला पट्टा : दादांच्या पांडू हवालदार या चित्रपटाने लोकप्रियतेचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला होता. यातील पांडू हवालदार हे पात्र अजरामर झाले आहे. या चित्रपटातील हे गाणेदेखील तितकेच लोकप्रिय असून आजही ताजे टवटवीत वाटते.

१३ ) माणसापरास मेंढर बरी : दादांच्या या गाण्यात तत्वचिंतनपर संदेश देण्यात आला आहे. माणसापेक्षा मेंढरदेखील बरी असल्याचे यातील नायक सांगत आहे.

१४) आला महाराजा…सोबत बेंडबाजा : रामराम गंगाराम या चित्रपटातील आला महाराजा हे गाणे खास दादांच्या विनोदी शैलीत सादर करण्यात आले आहे.

१५) पहिली शंभराची नोट : बोट लावीन तिथ गुदगुल्या या चित्रपटातील पहिली शंभराची नोट हे गाणे भन्नाट आहे. तू सागर मी जलधारा…मी नौका तू रे किनारा ॥ नवतीचा सुटला वारा…घे जवळ मला दे थारा ॥ अशा शब्दांमधील प्रणयराधन आपले मन मोहून घेते.

Add Comment

Protected Content