दिवाकरदादा चौधरी : एक जिंदादिल माणूस ( आदरांजली )

ज्येष्ठ साहित्यीक दिवाकर श्रावण चौधरी यांचे नुकतेच देहावसान झाले. या अनुषंगाने दादांचे स्नेही तथा ख्यातनाम साहित्यीक नामदेव कोळी यांनी त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा.

खानदेशातील ज्येष्ठ साहित्यिक दिवाकर श्रावण चौधरी गेल्याची वार्ता आल्यानंतर विश्‍वासच बसला नाही. दादा म्हणजे एक जिंदादिल माणूस. यावल तालुक्यातील डांभुर्णी हे त्यांचं गाव. केळी बागायतीतील एक प्रगतिशील शेतकरी, माजी सरपंच, निष्ठावान राजकारणी. १९९० आणि १९९५ला यावल विधानसभा मतदार संघासाठी ते जनता दलाचे उमेदवार होते. त्यांच्या रोखठोक वक्तव्यांमुळे त्यांच्या सभा फार गाजत.

दिवाकर दादा मराठी साहित्यविश्‍वाला परिचित झाले ते स्क्रिझोफ्रेनिया या त्यांच्या आत्मकथानात्मक कादंबरीमुळे. मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या कादंबरी स्वागत झाले. पुढे याच कादंबरीची मराठी व हिंदी अनुवादीत आवृत्ती पेंगुइन हिंदी या मातब्बर प्रकाशन संस्थेने काढली. त्यांचे ज्येष्ठ बंधू कवी गणेश चौधरी यांना जडलेल्या स्क्रिझोफ्रेनिया आजारामुळे त्यांच्या हातून बायको व मुलांची हत्या झाली. दिवाकर दादांच्या जीवनात या घटनेमुळे प्रचंड उलथापालथ झाली. पोलीस स्टेशन, कोर्ट-केस, जामीन, जन्मठेप, मनोरुग्णालय, त्यांची शुश्रूषा यातच त्यांच्या आयुष्यातला बराच काळ गेला. पण दादांनी खचून न जाता खंबीरपणे गणेश चौधरींचा सांभाळ केला, तुषार्त आणि तुषार्त नंतरच्या कविता हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित केले. पैकी तुषार्तला त्याकाळी शासनाचा पुरस्कारही मिळाला होता. स्क्रिझोफ्रेनिया कादंबरीत हा सर्व पट त्यांना जीवंत उभा करण्यात यश आले आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.ए. मराठी वर्गाला ही कादंबरी अभ्यासक्रमात होती. अलीकडे त्यांनी बुर्झ्वागमन ही कादंबरी लिहिली होती. या कादंबरीवर बुर्झ्वागमन हा वैभव मांगले अभिनीत मराठी चित्रपटही आला. स्क्रिझोफ्रेनिया या कादंबरीवर सिनेमा करण्यासाठी अनेक दिग्दर्शकांनी त्यांना विचारणा केली, पण हा विषय सिनेमॅटिक होऊ नये म्हणून पटकथा स्वतः लिहिणार ही त्यांची अट होती, विशेष म्हणजे त्यांनी पटकथाही लिहिलेली आहे.

चळवळीशी कायम जुळलेल्या दादांनी खानदेशातील लिहिणार्‍यांना कायम प्रोत्साहित केले. बाळकृष्ण सोनवणे, महेंद्र भास्करराव पाटील, रवींद्र भास्करराव पाटील, अजीम नवाज राही, अशोक कौतिक कोळी, गोपीचंद धनगर, रत्नाकर कोळी, मोरेश्‍वर सोनार, प्रफुल्ल पाटील, योगेश पाटील, विजय लूल्हे, भैय्या उपासनी, राया उपासनी, संजय हिंगोणेकर, शशिकांत हिंगोणेकर, सुरेश यशवंत, आटपडे ही साहित्यिक मंडळी दादांच्या कायम बैठकीतली. अनादि हे नियतकालिकही सुरु केलं होतं. त्याचे काही अंक बाळकृष्ण सोनवणे यांनी संपादित केलेले आहेत. डॉ.विवेक चौधरी आणि पुरुजीत चौधरी ही त्यांची मुलं. दादांना माणसं जमवणं फार आवडायचं. आठवडाभर आमची भेट नाही झाली की ते आम्हाला फोन लावून बोलवून घ्यायचे. दवाखान्यातलीच एक एसी रुम कायमची आमच्यासारख्या मित्रांसाठी राखीव असायची. बोलीभाषेत बोललं पाहिजे आणि लिहिन्यातूनही बोलीला योग्य स्थान देण्याबाबत ते कायम आग्रही असत. बोलीचा हा आग्रह त्यांनी आजन्म पाळला. आम्हाला निरोप द्यायला ते दवाखान्यातून बाहेर यायचे, आमच्यासोबत रस्त्यावरल्या टपरीवर चहा घ्यायचे, त्यांना सिगारचं प्रचंड व्यसन म्हणजे चेनस्मोकरचं. ते टपरीमागे जावून चोरून सिगारेट ओढायचे. त्यांच्या सिगार ओढण्यावर डॉक्टरांनी बंदी घातलेली होती. पण आम्ही आलो की त्यांना हे बेहद्द आवडणारं व्यसन पूर्ण करता यायचं.

जळगावला राहत असले तरी त्यांनी गावाशी नाळ तुटू दिली नव्हती. गावात प्रत्येक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असायचाच. गावात एकोपा नांदावा म्हणून ते झटत रहायचे. शेती तर आहेच पण गावात त्यांची शाळा होती म्हणून त्यांना कायम तिथला ओढा होता. गणेश चौधरी यांच्या प्रयत्नांतून ही शाळा उभी राहिली आहे म्हणूनही जास्त लगाव असावा. मधल्या काळात त्यांनी डी.एड. कॉलेजही सुरु केलं होतं, पण दुर्दैवाने ते बंद पडलं. त्या काळात दादा फार अस्वस्थ झाले होते. कोट्यवधी रुपयांचं हे नुकसान होतं, त्याहीपेक्षा भावी शिक्षक असणार्‍या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं नुकसान होईल याच धक्क्याने ने आजारी पडले. सुदैवाने मुलांना दुसर्‍या महाविद्यालयात समाविष्ठ करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. तेंव्हा त्यांच्या जीवात जीव आला. मुलांच्या पालकांना विश्‍वासात घेऊन पै-पै करून फी परत केली. दादा गप्पातून त्यांच्या भूतकाळात जावून यायचे साहित्य, राजकारण, समाजकारण, शिक्षण, भाषा असा चौफेर प्रदेश फिरून यायचे. सरपंचाची डायरी हे पुस्तक ते खूप दिवसांपासून लिहित होते, आमच्याशी चर्चा करीत होते. त्यांच्या हयातीत हे पुस्तक यायला हवं होतं. आम्हा मित्रांचे काही कुठे छापून आलं की त्यांना अपार आनंद व्हायचा, एखाद्याची नव्याने लिहिलेली कथा-कविता ते त्यालाच वाचायला सांगायचे. काही सुधारणा असल्या तर आवर्जून सांगायचे. मनभरून दादही द्यायचे.

आज भल्या पहाटे महेंद्र बापूंनी दादा गेल्याची बातमी दिली. आणि सर्व पट आठवला. त्यांची सिगार ओढतानाची तल्लीन मुद्रा आठवली. त्यांचे टेरेफिक, बेस्ट, एक्सलंट हे शब्द आठवले जे नेहमी आम्हाला दाद देताना वापरायचे. दिवाकर दादा तुम्ही आमच्या हृदयात कायम आहात.

: नामदेव कोळी

Add Comment

Protected Content