विद्येच्या मंदिरावरील हॉरर ‘परछाया’ : काय आहे नेमका वाद ?

चाळीसगाव, प्रतिनिधी । येथील आनंदीबाई बंकट स्कूलमध्ये A.B. High School Chalisgaon चित्रीकरण करण्यात आलेली परछाया ही हॉरर वेबसेरीज प्रदर्शीत झाली असतांना आता यावरून प्रचंड वाद निर्माण झाले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर विपरीत परिणाम होण्याचा धोका असल्याने या सेरीजच्या चित्रीकरणासाठी नेमकी कुणी परवानगी दिली हा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. या वादातील सर्व कंगोरे अगदी संबंधीत वेब सेरीजच्या प्रोमोसह आम्ही आपल्याला सादर करत आहोत.

चाळीसगाव येथील आनंदीबाई बंकट A.B. High School Chalisgaon या शतकोत्तरी परंपरा असणार्‍या शाळेत परछाया नावाची वेबसेरीज चित्रीत करण्यात आली असून याचा ट्रेलर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे. याचमुळे आता याला विरोध होतांना दिसत आहे. चॅनल वन या व्हिडीओ-ऑन-डिमांड या प्रकारातील मंचावरून ही वेब सेरीज पाहता येणार आहे.

नेमके काय आहे प्रकरण ?

चाळीसगाव तालुक्याच्या शैक्षणिक इतिहासामध्ये आनंदीबाई बंकट शाळेचे A.B. High School Chalisgaon मोलाचे योगदान आहे. १९०९ साली सुरू झालेल्या या शाळेतून शिकलेले हजारो विद्यार्थी जगभरात विखुरले आहेत. अनेक मान्यवरांनी येथून शिक्षण घेतले आहे. आजही ही शाळा अविरतपणे विद्यादानाचे काम करत आहे. सध्या लॉकडाऊन सुरू असून येथे काही दिवसांपूर्वी परछाया या वेब सेरीजचे चित्रीकरण करण्यात आले. चित्रीकरण होत असतांना याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. तर कालच याचा ट्रेलर जाहीर झाल्यानंतर ही वेबसेरीज हॉरर या प्रकारातील असल्याचे उघडकीस आले. यामुळे माजी विद्यार्थ्यांसह पालकांनी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली आहे.

विरोध कशासाठी ?

परछाया या वेब सेरीजमध्ये अनेक भयावह दृश्ये असून यात आनंदीबाई बंकट शाळेची वास्तू स्पष्टपणे दिसून येत आहे. यामुळे आपल्याच शाळेतील परिसरात थरकाप उडविणारी चित्रे बघून बाल मनांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे शाळेच्या व्यवस्थापनाने या सेरीजच्या चित्रीकरणाला परवानगी का दिली ? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे.

माजी विद्यार्थ्यांचे आरोप

दरम्यान, आनंदीबाई बंकट हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विद्येच्या मंदिरात अशा प्रकारच्या वेब सेरीजला परवानगी देणे हे चुकीचे असून याबाबत शाळेच्या व्यवस्थापनाने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी माजी विद्यार्थ्यांनी केली आहे. एकंदरीतच हा मुद्दा आता वादाच्या भोवर्‍यात सापडल्याचे दिसून येत आहे.

प्रोमोवर बहुतांश पॉझिटीव्ह प्रतिक्रिया

परछाया या वेब सेरीजच्या चित्रीकरणाला परवानगी दिल्यामुळे आनंदीबाई बंकट शाळेच्या व्यवस्थापन समितीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत असले तरी युट्युबवरील याच्या प्रोमोवर मात्र बहुतेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यामध्ये अनेकांनी आपण या शाळेचे माजी विद्यार्थी असून ही सेरीज बघण्याची आपल्याला उत्सुकता असल्याचे नमूद केले आहे.

संचालक काय म्हणतात

आ. बं. विद्यालयातील परछाया या शुटींगमुळे खळबळ उडाली असून संचालकांच्या भूमिकेवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. याबाबत व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधीत चित्रीकरण होत असलेली वेब सेरीज ही हॉरर प्रकारातील असल्याची माहिती देण्यात आली नसल्याचे सांगितले. असे असते तर आम्ही याला परवानगी दिलीच नसती असे ते म्हणाले.

आता पुढे काय ?

शनिवारी सकाळी परछाया या वेब सेरीजबाबत सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू झाली. तर रविवारी या चर्चेला अजून एक नवीन आयाम मिळाला. या प्रकरणी चित्रीकरणाला परवानगी देणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच या वेब सेरीजवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी आता करण्यात येत आहे. तर चॅनल वनच्या अ‍ॅपवरून ही सेरीज सर्वांसाठी आधीच उपलब्ध झाल्यामुळे बंदीच्या मागणीने काहीही होणार नसल्याचेही आता दिसून येत आहे.

खालील व्हिडीओत आपण परछायाचा प्रोमो पाहू शकतात.

Protected Content