आजपासून सुरू झाली उष्णतेची लाट : संपूर्ण महिना पारा चढलेलाच, जाणून घ्या अंदाज !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे मध्यंतरी तापमानाबाबत दिलासा मिळाला असला तरी आता पुढील संपूर्ण महिनाभर उष्णतेची लाट कायम राहणार असून आजपासून याचा प्रारंभ झाला आहे.

यंदा एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात पडला. यामुळे सरासरीपेक्षा कमी तापमान राहिले. अवकाळी पाऊस, वादळी वारे, तुफानी गारपिट याच्यामुळे शेतशिवारासह नागरी वस्त्यांमध्ये देखील मोठी हानी झाली. मात्र यामुळे एप्रिल महिना हा काही प्रमाणात सुसह्य देखील झाला. मात्र आता मे महिन्यात तापमानाचा पारा चढल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्‍वभूमिवर, एक्युवेदर या जगभरात ख्यातप्राप्त असणार्‍या वेदर पोर्टलच्या मदतीने आगामी दिवसांचा आढावा घेतला असता उष्णतेची लाट ही कायम राहणार असल्याचे दिसून आले आहे. आज अर्थात ९ मे २०२३ रोजी पारा चढलेला आहे. आजचे जळगावचे अधिकतम तापमान हे ४३ ते ४४ अंश सेल्सियसच्या दरम्यान राहणार असल्याचे यात नमूद करण्यात आलेले आहे.

तर दुसरीकडे आगामी काही दिवसांचा आढावा घेतला असता उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे एक्युवेदरने स्पष्ट केले आहे. यात उद्या म्हणजे १० मे पासून हॉट वेव्ह सुरू होणार असून संपूर्ण आणि जवळपास निम्मा जून महिना ती कायम राहणार आहे. उद्यापासून तापमान हे ४३ अंशांपेक्षा जास्त राहणार आहे. यानंतर सातत्याने पारा हा ४० अंशाच्याच पलीकडे राहणार आहे. १३ जून नंतर तापमान हे ४० अंशाच्या खाली येणार असल्याचा अंदाज एक्यु-वेदरने व्यक्त केला आहे. अर्थात, आगामी सुमारे ३४ दिवस हे भयंकर उष्णतेची असतील असे यातून अधोरेखीत झाले आहे.

Protected Content