विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी जय्यत तयारी

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २७ वा पदवीप्रदान समारंभ ९ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात होणार असून याची जय्यत तयारी सुरू आहे.

या दीक्षांत समारंभात ३८ हजार ९१२ स्नातकांना पदवी तर ९० विद्यार्थ्यांना सुवर्णपदक दिले जाणार असून अमेरिकेतील सुप्रसिद्ध भारतीय उद्योजक डॉ. मुकुंद करंजीकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ.करंजीकर हे टेक्नॉलॉजी होल्डिंग, एलएलसी सॉल्ट लेक सीटी येथे डायरेक्टर ऑफ इनोव्हेशन आहेत. यंदा पदवी प्रमाणपत्रावर विद्याशाखेचे नाव छापण्यात आले आहे. तसेच स्नातकाच्या आईचे नाव देखील प्रमाणपत्रावर आहे. प्रमाणपत्रावर क्यूआर कोड राहणार असून या कोडचा उपयोग मोबाइल अ‍ॅप्लिकेशनद्वारे पदवी पडताळणीसाठी होणार आहे. या वर्षापासून प्रमाणपत्रावर विद्यापीठाचा होलोग्राम असणार आहे.

दरम्यान, या पदवीप्रदान समारंभात ३८ हजार ९१२ स्नातकांना पदव्या बहाल करण्यात येणार आहे. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे १५ हजार ६३१ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ४ हजार ४६६ स्नातक, मानव्य विद्याशाखेचे १७ हजार ७८८ आणि आंत विद्याशाखेचे १ हजार ५७ स्नातकांचा समावेश आहे. गुणवत्ता यादीतील ९० विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्णपदक दिले जाणार आहे. या समारंभात प्रत्यक्ष पदवी घेण्यासाठी २२ हजार ४१९ विद्यार्थ्यानी नोंदणी केली असून त्यामध्ये २५१ पीएच.डी.धारक विद्यार्थी आहेत.

दीक्षांत समारंभाच्या दिवशी प्रशासकीय इमारतीजवळ स्नातकांसाठी सेल्फीस्टँड उभारण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर याशिवाय मोबाइल मेसेजद्वारेदेखील डिग्री कोड पाठवला आहे. पदवी ग्रहण करण्यासाठी दीक्षांत समारंभाच्या दिवशी हा प्राप्त झालेला डिग्री कोड, ओळखपत्र किंवा ओळखदर्शक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. स्नातकांना पदवी प्रमाणपत्र मिळणे सोयीचे व्हावे, याकरीता पदवी प्रमाणपत्राचे वाटप अभ्यासक्रमनिहाय काउंटरवर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Add Comment

Protected Content